निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यातील मासेमारी बंदरे आणि व्यावसायिक बंदरे आता अधिक सुरक्षित होणार आहेत. राज्यातील सर्वच मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या मासेमारीला आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे बंदरांवर चालणाºया अवैध उद्योगांवरही नजर ठेवता येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील २० बंदरे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा धोकादायक बंदरांवरील सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेऊन उपाययोजना करणे आवश्यक होते. या ठिकाणी सीसीटीव्ही तैनात झाले तर किनारपट्टीवर चालणाºया अवैध उद्योगांना अटकाव होईल आणि सुरक्षाही बळकट होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्याला मुंबई बॉम्बस्फोटाचा इतिहास आहे. १९९२-९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रामार्गे मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असणाºया बंदरांवर परदेशातून मोठ्या संख्येने मालवाहू जहाजे येतात. त्यामुळे बंदरांवरील घटनांवर नजर ठेवणे आवश्यक आहे.
जिल्ह्याला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून शेतीबरोबरच मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यात १ हजार ४९९ बिगरयांत्रिकी नौका आहेत, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. आजही जवळपास ३० हजारांहून अधिक कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. दरवर्षी सुमारे ३९ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. यातील ३० टक्के उत्पादन परदेशात निर्यात केले जाते आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मच्छीमारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मच्छीमारांमध्ये वाद विकोपाला गेले आहेत. पर्ससिन नेट आणि एलईडीच्या साहाय्याने चालणारी मासेमारी यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने सर्वच यंत्रणांची झोप उडत आहे.रायगड जिल्ह्यातील संवेदनशील बंदरमांडवा, रेवस, आरसीएफची जुनी जेट्टी, थळ नागाव, अलिबाग मुख्य समुद्र, रेवदंडा समुद्र - १ आणि २, साळाव-नांदगाव, मुरूड-खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी बंदर जेट्टी, दिघी प्रवासी जेट्टी, जीवना बंदर, शेखाडी, बागमांडला, मांदाड, दादर, आंबेत या बंदरांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.मच्छीमार जेट्ट्या आणि बंदरांवर होणाºया वाहतुकीवर नजर राहावी, अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांना अटकाव करता यावा आणि सागरी सुरक्षा बळकट व्हावी या उद्देशाने आता सर्व मासेमारी बंदरांवर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारीला अटकाव बसेल त्याचप्रमाणे किनाºयांची सुरक्षा वाढेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.सरकारने एलईडीच्या साह्याने होणाºया मासेमारीस बंदी घातली आहे. पण तरीही जास्त मत्स्य उत्पादन मिळावे, या हव्यासापोटी काही मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया मच्छीमारांची आर्थिक कोंडी होत आहे. पारंपरिक विरुद्ध आधुनिक मच्छीमार असा वाद निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता मच्छीमार जेट्यांवर सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.रायगड जिल्ह्यातील सर्व मासेमारी बंदरांचे सर्वेक्षण करून तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीमुळे बेकायदा उद्योगांना आळा बसेल आणि बंदरे सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. - सुरेश भारती, साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड