खारघर शहरासाठी हवा पूर्णवेळ सिडको प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:51 AM2018-11-17T04:51:11+5:302018-11-17T04:51:25+5:30
नागरिकांची होत आहे गैरसोय: नागरी सुविधांवर होत आहे परिणाम
पनवेल : खारघर शहराला सिडकोच्या माध्यमातून पूर्णवेळ प्रशासकाची गरज आहे. ४0 सेक्टरमध्ये व्याप्ती असलेल्या या नोडमध्ये पूर्णवेळ प्रशासकांची नितांत आवश्यकता आहे. नुकतेचरुजू झालेले खारघर नोडचे प्रशासक रमेश गिरी हे इतर नोडच्या जबाबदारीमुळे खारघर सिडकोच्या कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सिडकोच्या माध्यमातून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून खारघर शहराची ओळख आहे. गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आदींसह विविध प्रकल्प सध्याच्या घडीला खारघर शहरात सुरू आहे. यासह तीन लाखांची व्याप्ती असलेल्या खारघर शहरात पाणी, कचरा आदींसह विविध प्राथमिक सुविधांचा अभाव पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिक सिडकोचे जबाबदार अधिकारी म्हणून प्रशासकाची भेट घेत असतात. मात्र खारघर शहरातील प्रशासक जागेवर उपलब्ध नसल्याने शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
खारघर सिडकोचे नवनियुक्त प्रशासक रमेश गिरी यांची आॅक्टोबर महिन्यात खारघर शहराच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर उलवा, द्रोणागिरी या सिडकोच्या दोन नोडची देखील जबाबदारी असल्याने त्यांना खारघर शहराकरिता वेळ देता येत नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नोडच्या तुलनेने खारघर शहराची व्याप्ती मोठी आहे.
शहरात विविध समस्या, अडचणी उद्भवल्या तर सामान्य नागरिक सिडको अधिकाऱ्यांची भेट घेत असतो. मात्र खारघर सिडकोच्या कार्यालयात प्रशासक उपलब्ध होत नसल्याने शहरातील समस्यासंदर्भात कोणाशी चर्चा करावी हा प्रश्न पडतो. शहराला पूर्णवेळ प्रशासकाची गरज आहे. सिडको अध्यक्षांकडे देखील ही मागणी आम्ही करणार आहोत. - दीपक शिंदे, नागरिक, खारघर शहर
रमेश गिरी यांच्यावर खारघरसह द्रोणागिरी, उलवे नोडची जबाबदारी असल्याने ते खारघर सिडको कार्यालयात पूर्णवेळ बसू शकत नाहीत. या तिन्ही नोडचे एकत्रित काम रायगड भवन ५ वा माळा येथून पाहणार आहेत.तशाप्रकारच्या नोटीस सर्व सिडको कार्यालयात त्वरित लावण्यात येतील.
- प्रिया रातंबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको