इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:48 AM2020-02-17T00:48:05+5:302020-02-17T00:48:22+5:30
वनविभागाचे आवाहन : मोटारसायकल रॅली काढून के ली जनजागृती
पेण : फाल्गुन मासाचा प्रारंभ २४ फेब्रुवारीपासून होत असून, यानंतर वेध लागतात ते होळी सणाचे. पेण वनविभागाने पर्यावरण पूरक, इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. यासाठी वनविभागाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे.
यासाठी पेण वनविभागाचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी जनजागृतीवर भर देण्यासाठी कंबर कसली असून, पेण शहरात वनपाल, वनरक्षकांनी मोटारसायकल रॅली काढून इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन केले. फाल्गुन महिना उजाडला की गावाच्या वेशीवर सात दिवस होळी पेटवली जाते. गावातील लहान मुलांचा हा खेळ सुरू असतो. यासाठी झाडांच्या फांद्या तोडून त्याची होळी बनवून पेटवली जाते. सोमवार, ९ मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण साजरा होणार असल्याने आधीच फाल्गुन मास त्यात वृक्षतोडीचा उल्हास हा असुरी आनंद पर्यावरणाला घातक ठरणारा आहे. यामुळे जागतिक तापमानवाढ व नैसर्गिक आपत्तीचा सामना आज जगातील घडलेल्या अनेक घटनांनी दिसून आला आहे. सच्चे वृक्षप्रेमी बनून निसर्ग संतुलन राखण्यासाठी वृक्षतोड न करता इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करावा, असा संदेश देत चौकाचौकांत जाहीर आवाहन करण्यात आले.
येत्या १५ दिवसांत प्रत्येक विभागात ही जनजागृती ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन करण्यावर पेण वनविभागाची मोहीम सुरू राहणार आहे. वृक्षतोड करताना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले. सुकी लाकडे, पालापाचोळा, भाताचा पेंढा, केळीच्या पानांचा वापर, शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर पर्यावरणपूरक होळी उभारण्यासाठी करावा. सण साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्रत्येक नागरिकाने दक्षता घेत होळी सणाचा आनंद साजरा करावा.