अलिबाग : बुधवारी रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदचा चंद्र मंगळवारी रात्री दिसल्यानंतर बुधवारी सकाळी ठिकठिकाणच्या मशिदीमध्ये ईदनिमित्त खास नमाज पठण करण्यात आले. जिल्ह्यातील लाखो मुस्लीम बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला.
मुस्लीम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फित्र व दुसरी ईदुज्जुह होय. ईद उल फित्र ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. या वेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम राहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. ‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदीबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदनिमित्त आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. अलिबाग शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचा रमजानचा महिना हा २९ दिवसांचा झाला आहे. ईद साजरी करण्यासाठी हिंदू धर्मातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
म्हसळा : चंद्रदर्शनाने पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली. बुधवारी या दिवशी म्हसळा तालुक्यातील मुस्लीम आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रमजान ईद अर्थातच ईद उल फित्रचा सण साजरा केला. बुधवारी सकाळी ६ वाजता ईदची नमाज नवानगर जवळील ईदगाहमध्ये अदा करण्यात आली. शहरातील सर्व मशिदीत नमाज (प्रार्थना)अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी केली होती.
ईदनिमित्त मोहल्ल्यातील घराघरांत उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घरोघरी शिरखुर्मा, आणि अन्य गोड पदार्थ बनविण्यात आले होते. मुस्लीम बांधवाना ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हिंदू धर्मीयांमध्ये ही उत्साह होता.
आगरदांडा : समाजातील सलोखा कायम राहून एकमेकांशी बंधुभाव राखून एकात्मता निर्माण होण्यासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन होणे खूप महत्त्वाचे असून, यामधूनच सामाजिक सलोखा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस उपाधीक्षक दत्तात्रेय निघोट यांनी मुरुड येथे केले. मुरुड पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम समाज बांधवांसाठी रमजान दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्वांना ईदच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
मोहोपाडा : मंगळवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात व आनंदात तुपगाव मोहल्ला व चौक परिसरातील मुस्लीम बांधवानी बुधवारी रमजान ईद साजरी केली. गेला महिनाभर रमजान महिन्यात रोजे (उपवास) केल्यानंतर व काल चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर झाल्यावर सकाळी तुपगाव येथील जामा मशीदमध्ये नमाज अदा झाल्यावर अन्न ग्रहण करण्यात आले. बुधवारी सकाळपासूनच ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे, मोबाइलवर शुभेच्छा दिल्या जात होत्या.
बोर्ली पंचतन : संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यामध्ये मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्येसाजरी के ली. बुधवारी सकाळी बोर्लीपंचतन येथील मुस्लीम बांधवांनी जामा मशीद, नागाव मशीद या ठिकाणी नमाज अदा केली. सर्व हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेचे कोकणचे आमदार अनिकेत सुनील तटकरे यांनी बुधवारी रमजान ईदनिमित्त श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.