अलिबाग : श्रमिक मुक्ती दलाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनामध्ये आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. राज्यभरात सर्वत्र मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला असेल; परंतु न्याय हक्कासाठी आंदोलन करणाºया शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मराठी राजभाषा दिन साजरा करणे हाच खरा मराठी भाषेचा गौरव आहे, असे निवृत्त प्राध्यापक श्याम जोगळेकर यांनी स्पष्ट केले. माय, मातृभूमी आणि मातृभाषा याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
मराठीचा वापर व्यवहारात केला जातो. मात्र, सरकारी कार्यालय आणि न्यायालयामध्ये आजही मराठीचा वापर केला जात नाही. न्यायालयाचे निर्णय हे इंग्रजीतून दिले जातात, त्यामुळे सर्वसामान्यांना कळणार कसे? असा सवालही त्यांनी करून सरकारने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आजकाल पालक अगदी दोन-अडीच वर्षांतच आपल्या लहान मुलांना प्ले ग्रुप नर्सरीमध्ये टाकतात; परंतु ते मूल पाच वर्षांचे होत नाही, तोपर्यंत त्यांना लिहिण्यास प्रवृत्त करू नये. कारण त्यांचे डोळे, बोट आणि मनगट नाजूक असतात. लहान वयातच सवय लावल्याने त्याचे त्यांच्या डोळ्यावर, बोटांवर आणि मनगटांवर होतात. परिणामी, मुले दुसरी अथवा तिसरीमध्ये गेल्यावर लिहण्यास कंटाळा करतात, असेही प्राध्यापक श्याम जोगळेकर यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांच्यासोबत अन्य सात जिल्ह्यांतील शेतकरी १२ ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनात सक्रिय असतानाही त्यांना मराठी राजभाषा दिवसाचा विसर पडलेला नाही, हे विशेष आहे, त्यांचे आंदोलन राज्यभरातील एकमेव आंदोलन आहे, असेही त्यांनी सांगितले.