जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By Admin | Published: August 16, 2016 04:48 AM2016-08-16T04:48:28+5:302016-08-16T04:48:28+5:30
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते
अलिबाग : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक परेड कमांडर सुनील जायभाय यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस दलाच्या पथकांनी पालकमंत्री महेता यांना मानवंदना दिली.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री महेता यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली. महाड येथील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेबद्दल राज्यातच नव्हेतर देशभरात शोक व्यक्त केला गेल्याचे महेता यांनी नमूद केले. त्यानंतर उपस्थितांनी महाड येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री महेता यांच्या हस्ते या वेळी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र दंडाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, चिटणीस एम.एस. देशमुख, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.
शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
(विशेष प्रतिनिधी)