नवी मुंबई : कोळ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. दर्या सागराला रूढी परंपरेनुसार मान देण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत, गर्दी टाळून संपूर्ण नवी मुंबईतील कोळीवाड्यातील आगरी-कोळी महिलांनी दर्या राजाला नैवेद्य दाखवून सजविलेल्या सोन्याचा नारळ अर्पण केला. दर्यासागराची पूजा आणि आरती करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून, त्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता, ना वाजंत्री, ना नाचगाणी, ना मोठा जल्लोष अशा शांत वातावरणात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
‘मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे’ अशी दर्या देवाकडे कोळी भगिनींनी साकडे घातले. घणसोली गावच्या कोळीवाड्यातील जय मरीआई मित्रमंडळ व महिला मंडळाच्या वतीने गावकीचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ भोईर, आगरी कोळी युथ फौंडेशनचे पदाधिकारी भानुदास भोईर, गणेश कोळी, प्रदीप भोईर यांच्यासह गावकीच्या चार ते पाचप्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत घणसोली खाडी किनारी
सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला.ऐरोली-दिवा कोळीवाडा येथील नवजीवन कला पथकाच्या वतीने अध्यक्ष चंदन मढवी, प्रल्हाद नाईक, यशवंत दिवेकर आणि नामदेव पाटील, नीलेश पाटील, जयेश पाटील, रूपेश पाटील यांनी कोणताही गाजावाजा किंवा मिरवणूक न काढता, दुपारी १२ वाजता भव्यदिव्य सोन्याचा नारळ सागर देवाला ऐरोली-मुलुंड पुलाखाली अर्पण करून विधिवत पूजा केली.नवी मुंबईत बेलापूर दिवाळे कोळीवाडा जेट्टी येथे सिद्धी ग्रुपचे प्रमुख प्रवीण कोळी, प्रेम सागर पथकाचे गजेंद्र कोळी, त्याचप्रमाणे साई छाया कला पथक आणि दिवाळे फगवाले मच्छीमार संस्था, तसेच काही महिला भगिनींनी एक-एक तासांच्या अंतराने पाच जणांच्या ग्रुपने सागरी किनाऱ्यावर जाऊन रूढी-परंपरेनुसार पूजन केले. यात बच्चे कंपनी सामील होती.
सारसोळे येथे मानाची पालखी
च्सारसोळे कोळीवाड्यातील आगरी कोळी बांधवांच्या वतीने सजविलेल्या मानाच्या पालखीतून पामबीच येथील सारसोळे खाडीत होडीची विधिवत पूजा करून दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कोलवानी माता मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, कोळी प्रकल्पग्रस्त सेवा संघाचे अध्यक्ष नीलेश तांडेल कोळीराजा, परशुराम मेहेर, अमोल मेहेर आदी उपस्थित होते.