जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2015 10:56 PM2015-08-15T22:56:45+5:302015-08-15T22:56:45+5:30

रायगड जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळत आहे, अशी प्रशंसा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे

Celebrating Independence Day in the district | जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन जल्लोषात

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन जल्लोषात

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळत आहे, अशी प्रशंसा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ६८ वा वर्धापनदिन पोलीस परेड मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती चित्रा पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती भाई पाशिलकर, समाज कल्याण सभापती गीता जाधव, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले आदी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अल्प मुदतीच्या कर्जाचे रूपांतर मध्यम मुदत कर्जामध्ये केले आहे. जे शेतकरी कर्जाचा वार्षिक हफ्ता बँकेत विहित मुदतीत भरतील त्यांच्या कर्जावरील व्याज २०१५-१६ मध्ये माफ करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांसाठी ६ टक्के दराने व्याज भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी या योजनेतील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, असे मेहता यांनी सांगितले.
रायगड महसूल प्रशासनाने या वर्षी ५१ शिबिरांचे आयोजन करून १३ हजार ५९३ दाखल्यांचे वापट केले. दळी जमिनींबाबत जिल्हास्तरीय समितीने ६६३ दावे मंजूर करून त्यांना टायटल प्रमाणपत्र दिले आहे. ज्यायोगे २४१.८१ हेक्टर वनक्षेत्रावर आदिवासींना हक्क देण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३४६ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी ६७१.१८ लाख खर्च करण्यात आले आहेत. सरकारने नव्याने एक लाख विहिरी व ५० हजार शेततळ्याचा कार्यक्र म घेण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानदेखील यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय असल्याने महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात १६ संरक्षण अधिकारी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र म्हणून लागू केलेल्या ५० गावांपैकी २४ गावांमधील ६३०७ हेक्टर जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू आहे. भूसंपादन संस्थेकडून ३५० कोटी रु पये नुकसानभरपाई रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी ३३६ कोटी रकमेचे वाटपही करण्यात आले आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील गुणवंतांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. या गुणवंतांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात प्रावीण्य संपादन केल्याबद्दल विवेक गणेश थळे, तर हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य संपादन केल्याबद्दल रु पाली कृष्णांत पाटील, शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल खारघरची विद्यार्थिनी मंडल तुंगाद्री, सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालय पेणची विद्यार्थिनी सृष्टी रमेश दारकुंडे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Web Title: Celebrating Independence Day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.