अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनिमित्त अलिबाग तालुक्यात भारतीय जनता पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील पक्ष कार्यालयासमोर नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे एलसीडी लावून थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तत्पूर्वी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील शपथविधी सोहळ्याबाबत सर्वत्र उत्सुकता होती. भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता शहरातील पक्ष कार्यालय येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
आतशबाजी करून पेणमध्ये आनंदोत्सवपेण शहरात भाजप-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चौकाचौकांत फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. पेण नगरपरिषदेच्या समोरच्या कोतवाल चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौकामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. या वेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करण्यासाठी शहरातील चौकाचौकांत नागरिक सहभागी झाले होते.
खारघरमध्ये शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपणदेशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. या शपथविधीची चर्चा देशभरात सुरू असताना खारघरमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शहर भाजपच्या वतीने करण्यात आले होते. शहरातील शिल्प चौक परिसरात एका मोठ्या स्क्रीनवर हे प्रक्षेपण सुरू होते.