जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:41 AM2019-02-20T03:41:05+5:302019-02-20T03:41:22+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Celebration of Shiv Jayanti celebration in the district; | जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

googlenewsNext

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा कणखर घोषणांनी रायगड जिल्हा दणाणून गेला. अलिबागसह जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. चौकाचौकामध्ये विविध सामाजिक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. अलिबाग नगर परिषद, राजकीय सामाजिक संघटनांनी अलिबाग येथील शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

अलिबाग : किल्ले रायगडावर मंगळवारी सकाळपासून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकाही लक्षवेधी ठरल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला, त्या रायगड जिल्ह्यात मंगळवारी शांतिमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यातही सकाळपासूनच शिवप्रेमींच्या रांगा लागल्याचे दिसून आले. रायगड जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर शिवप्रेमींचा दिवसभर राबता होता. शिवजयंतीनिमित्त हातात शिव ध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता आणि फेटे बांधलेल्या युवकांच्या उत्साहाला उधाण आले होते. महिलांनी भगव्या साड्या, नाकात नथ आणि भगवे फेटे बांधून पारंपरिक पोषाखात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या
अलिबाग शहरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये युवकांनी भगवे झेंडे, भगवे फेटे असे सगळेच वातावरण भगवेमय झाले होते. भवानी मातेची सुमारे सात फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. ती पाहण्यासाठीही नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अलिबाग येथील शिवाजी चौकामध्ये अलिबाग नगर पालिकेमार्फत अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध सामाजिक, राजकीय संघटनांनीही महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
शिवजयंतीनिमित्त चौकाचौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ध्वनिक्षेपकावर स्फूर्तिदायक पोवाडे लावण्यात आले होते. काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानेही आयोजित करण्यात आली होती.

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला फुलांची सजावट

१पोलादपूर : तालुक्यासह कोकणपट्टीत शिवजयंती जरी तिथीप्रमाणे धूमधडाक्यात साजरी होत असली, तरी गेल्या चार वर्षापासून १९ फेब्रुवारी तारखेनुसार साजरी होणारी शासकीय शिवजयंती पोलादपूर येथे देखील शाळा-महाविद्यालय यांच्या माध्यमातून उत्साहात साजरी केली जाते. येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्व शिवभक्तांना नेत्रसुख देणारी ठरली. या ठिकाणी फुलांची सजावट मुंबई येथील उद्योजक असणारे काटेतळीचे चंद्रकांत मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आली.

यावर्षी शिवजयंती साजरी होत असताना पोलादपूर येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास येत्या १ मेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी सर्व ऐतिहासिक सोहळे श्री महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर यांच्यावतीने उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. सकाळी प्रथम पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना तसेच त्यानंतर कारवाईत शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याठिकाणी सकाळपासून अनेक शिवभक्त शिवप्रेमी संघटनांनी येऊन महाराजांना नतमस्तक होऊन वंदन केले. तालुक्यातील, शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी हे देखील या ठिकाणी येऊन वंदन करून गेले. पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कॉलेजच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली.

कॉलेजच्या सर्व तरु णाईने भगवे फेटे परिधान करून वातावरण भगवामय करून टाकले. पोलादपूर छत्रपती शिवाजी चौक ते चोळई कॉलेज अशी दोन किलोमीटरपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. कॉलेजच्या जवळ फेटेधारी मुला-मुलींनी लेझीमचा फेर धरत, महाराजांची पालखी नाचवत शिव उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी कॉलेजच्या प्राचार्यांसह सर्व प्राध्यापकांचा यावेळी सहभाग राहिला. पोलादपूर नगरीचे माजी सरपंच अमोल भुवड यांनी आपल्या चमूसह ऐतिहासिक मर्दानी खेळ साजरे करून अवघे वातावरण शिवमय केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Celebration of Shiv Jayanti celebration in the district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.