पनवेल:अयोध्या याठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिष्ठापने निमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. पनवेल मध्ये देखील हा आनंदोत्सव साजरा केला जात असुन पनवेल शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावागावमध्ये देखील रांगोळ्या काढून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पनवेल शहरातीलवडाळे लेक याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. खारघर शहरातील उत्सव चौकात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.शहरभर गाड्या,चौकात जय श्री रामाचा जयघोष आणि भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. नवीन पनवेल येथील जय अंबेमाता मंदिर मैदान येथे भव्य कार्यक्रम होणार असून या ठिकाणी पंधरा हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा, दीपोत्सव व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. खारघर,कळंबोली, खांदेश्वर ,कामोठा या ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा घेवून गल्लोगल्लीत मिरवणूका काढल्या जात आहेत. मंदीरे दिव्यांनी उजळी असून भगवी दिवाळी असल्याचे वातावरण पनवेल मध्ये तयार झाले आहे. कळंबोली येथे राममंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोमवार दि.22 रोजी कळंबोली येथील श्री राम मंदिर, एल.आय.जी येथे अभिषेक, पूजन, होम हवन विधिसह दुपारी 2 वा. श्रींरामाच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशा रोहन कार्यक्रम करण्यात येत आहे.पनवेल तालुक्यातील जवळपास 300 पेक्षा जास्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आणि सामान्य नागरिक या आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.