पोलादपूरमध्ये कब्रस्तान, दफनभूमी चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:23 AM2019-04-30T00:23:37+5:302019-04-30T00:23:52+5:30
१३४ श्रीसदस्यांसह नागरिकांनी के ली स्वच्छता: अभियानामध्ये सर्वसमावेशकतेचा आदर्श
पोलादपूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने पोलादपूर तालुक्यातील चांढवे, चरई, पोलादपूर शहरातील शिवाजीनगर मोहल्ला येथील कब्रस्तान व पोलादपूर लेप्रसी मिशन हॉस्पिटल येथील दफनभूमीच्या परिसरात रविवार २८ एप्रिल रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभिनव उपक्रमात विविध गावातील १३४ श्रीसदस्य आणि परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सुमारे ३७५ किलो कचऱ्याचे संकलन केले.
मागील महिन्यातच २४ मार्च रोजी जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून श्रीसदस्यांनी पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविली होती. या मोहिमेतून प्रेरणा घेऊन परिसरातील मुस्लीम व ख्रिश्चन बांधवांनी कब्रस्तान व दफनभूमी परिसर स्वच्छता मोहीम राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणाºया श्रीसदस्यांकडून ही आवश्यकता लक्षात घेऊन कब्रस्तान व दफनभूमी परिसर स्वच्छता मोहिमेची आखणी केली.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा व श्रीसदस्यांनी नियमितपणे स्वच्छ भारत अभियानाला सक्रिय योगदान देऊन अभियानाला खºया अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. हीच लोकचळवळ अधिकाधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना या स्वच्छता अभियानाबरोबर जोडण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यातील चरई, चांढवे, पोलादपूर शहरातील शिवाजीनगर मोहल्ल्यातील कब्रस्तान व पोलादपूर येथील लेप्रसी मिशन हॉस्पिटल दफनभूमी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.