'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:29 AM2020-06-18T01:29:52+5:302020-06-18T01:30:14+5:30
पालकमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी, अशी मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष रमेश कुमार गंटा यांना निवेदनाद्वारे केली.
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे आंतर मंत्रालयीन पथक मंगळावारपासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे. आदिती तटकरे यांनी पथकाची भेट घेऊन रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. १८९१ नंतरचे सर्वात मोठे असे चक्रीवादळ ३ जून, २०२० रोजी आले होते. ‘फयान’ वादळाचा मुंबईवर मोठा परिणाम झाला होता. एनडीआरए आणि एसडीआरएफचे सध्याचे निकष ‘निसर्ग’सारख्या चक्रीवादळाला पूरक नाहीत. केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या निकषानुसार अपुरी आहे, असे तटकरे यांनी पथकाच्या निर्दशनास आणून दिले.
भविष्यात ‘निसर्ग’सारखे चक्रीवादळ पुन्हा आल्यास विस्थापित लोकांसाठी कायमस्वरूपी निवारा घरे ही काळाची गरज आहे. म्हणून निकषात बदल करून अंतर्गत निवारा गृहांच्या बांधकामांना मंजुरी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी केंद्रीय पथकातील बी.के.कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस.मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषिमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते वाहतूक, महामार्ग, मुंबई) हे उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ‘घरगुती पर्यटन’ ही संकल्पना पूर्णत: कोलमडली आहे. कोकणातील घराजवळील परस बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परस बागेसाठी विशेष मदतीचे पॅकेजही केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.