चिरगाव गिधाड संवर्धन केंद्र होणार अभ्यास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:17 AM2018-01-09T02:17:00+5:302018-01-09T02:17:23+5:30
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाड पक्ष्याचे निसर्ग साखळीतील अनन्यसाधारण महत्त्व वेळीच विचारात घेवून गेल्या १७ वर्षांपूर्वी २००० मध्ये म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे सुरू केलेल्या गिधाड संवर्धन केंद्राच्या माध्यमातून गिधाडांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाड पक्ष्याचे निसर्ग साखळीतील अनन्यसाधारण महत्त्व वेळीच विचारात घेवून गेल्या १७ वर्षांपूर्वी २००० मध्ये म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे सुरू केलेल्या गिधाड संवर्धन केंद्राच्या माध्यमातून गिधाडांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आता या केंद्राचे रूपांतर ‘गिधाड अभ्यास व संवर्धन केंद्र’ यामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे संस्थापक व सिस्केप संस्थेचे प्रमुख तथा गिधाड अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
गिधाडांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम पर्यावरण संतुलनाच्या हेतूने हाती घेतले. २००० मध्ये गिधाडांची केवळ दोन घरटी आणि १८ एवढी संख्या येथे होती. आता गेल्या १७ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती चिरगावमध्ये गिधाडांच्या घरट्यांची संख्या ३० तर श्रीवर्धनमध्ये ४० झाली असून एकूण गिधाड संख्या २५० च्यावर पोहोचली असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.
म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थांंच्या सहकार्यातून सिस्केप संस्थेच्या माध्यमातून हे केंद्र चालविण्यात येते. देशातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपुष्टात आल्यावर पर्यावरणीयदृष्ट्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये ‘लाँगबील व्हल्चर’ व ‘व्हाईटबॅक व्हल्चर’ या दोन जाती रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढºया पाठीच्या गिधाडावर संशोधन सुरू केले. २००४ मध्ये चिरगाव येथे पांढºया पाठीच्या गिधाडांच्या वसाहतीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची केवळ दोन घरटी आढळली. आज या गिधाडांच्या घरट्यांची संख्या ४० च्यावर झाली आहे, तर गिधाडांची संख्या २५० च्यावर पोहोचलेली दिसून येते. ही संख्या आणि येथील जंगल वाढवण्यात ग्रामस्थांनी व विशेषत: तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा येथे केल्यामुळे त्यांच्या विणीच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. सप्टेंबर २००९ पासून ते मे दरम्यानच्या विणीच्या हंगामात ९ ते १४ गिधाडाच्या पिलांचा जन्म येथे होत आहे. गिधाडाची मादी आपल्या पिलांचे जन्मानंतर पुढील सात महिने संगोपन करीत असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.
गिधाडांच्या घरट्यांकरिता जंगली वृक्षनिर्मिती नर्सरी
गिधाडांना त्यांची घरटी बांधण्याकरिता अर्जुन, सातविन, बेहड, वनभेंट, हिरडा अशा उंच वृक्षांची गरज असते. याच निरीक्षणातून येत्या काळात याच वृक्षांच्या निर्मितीकरिता नर्सरी करण्याचे नियोजन केले असून त्यातून गिधाड संवर्धनास मोठी चालना मिळू शकणार आहे. अशा प्रकारे गिधाड संवर्धनाकरिता ही देशातील पहिलीच नर्सरी असेल, असे मेस्त्री यांनी सांगितले.
गिधाड संवर्धन ते अभ्यास केंद्र
गेल्या १७ वर्षांच्या या उपक्रमातून अनेक विद्यार्थी गिधाड अभ्यासात रस घेवू लागले आहेत. इरावती महागावकर यांनी चिरगाव गिधाड संवर्धन केंद्राचाच अभ्यास करुन डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. सद्यस्थितीत पुण्यातील गरवारे कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुंबईतील रुपारेल, वसई कॉलेज आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजमधील विद्यार्थी गिधाड अभ्यासाकरिता येथे येत असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी अभ्यास केंद्र उपलब्ध व्हावे याकरिता आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘चिरगाव गिधाड संवर्धन केंद्र’ याचे रुपांतर ‘गिधाड अभ्यास व संवर्धन केंद्र’ यामध्ये करण्यात येत असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.