मधुकर ठाकूरउरण: मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या सहकार्याने प्रवाशांना अनारक्षित डब्यांमध्ये स्वस्त दरात अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये प्रवासांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या लोकांसमोरील आव्हाने ओळखून परवडणारे अन्न पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
खिशासाठी अनुकूल रू. २०/- किंमतीचे हे जेवण प्रवास करताना प्रवाशांसाठी समाधानकारक आणि किफायतशीर पर्याय प्रदान करणारा आहे. ज्यांना हलका नाश्ता हवा आहे त्यांच्यासाठी रू. ५०/- चे न्याहारी जेवण देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हे जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता थेट खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्टेशनच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.
मध्य रेल्वेवर हे फूड काउंटर खालील स्थानकांवर उपलब्ध आहेत - मुंबई विभाग - इगतपुरी आणि कर्जतभुसावळ विभाग - मनमाड, खंडवा, बडनेरा आणि शेगावपुणे विभाग - पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डीनागपूर विभाग - नागपूर आणि वर्धासोलापूर विभाग - सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी
गेल्या वर्षी सुमारे ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार केला आहे. आता १०० हून अधिक स्थानकांवर आणि एकूण १५० काउंटरवर कार्यरत आहेत. भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश करून या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.