केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:42 AM2020-09-11T01:42:16+5:302020-09-11T01:42:25+5:30

वादळग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद

Central team reviews aid distribution; Notice to the Collector | केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Next

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच फटका दिला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे, बागा आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याचा आढावा केंद्रीय पथकाने गुरुवारी घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकामध्ये रमेशकुमार गंटा, आर.बी. कौल, एन.आर.एल.के. प्रसाद, एस.एस. मोदी, आर.पी. सिंग आणि तुषार व्यास यांचा समावेश होता. दौºयाच्या प्रारंभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली. पाहणी दौºयानंतर अलिबाग सोगाव येथील आउट पोस्ट हॉटेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहिची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

नुकसानभरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी चौधरी आणि मिश्रा यांना केल्या. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण यासंबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करून घ्यावीत, असेही सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाचे कौतुक

निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली. संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले; तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

Web Title: Central team reviews aid distribution; Notice to the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड