रायगडमध्ये केंद्रीय पथकाचा ताफा रोखला; काही काळ तणाव :

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:42 AM2020-06-17T04:42:30+5:302020-06-17T04:42:42+5:30

नागाव, नांदगाव येथे ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

Central team stopped in Raigad | रायगडमध्ये केंद्रीय पथकाचा ताफा रोखला; काही काळ तणाव :

रायगडमध्ये केंद्रीय पथकाचा ताफा रोखला; काही काळ तणाव :

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी मंगळवारी रोखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या रोषाला पथकाला सामोरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मंगळवारी सकाळी १० वाजता अलिबाग-मांडवा जेट्टी येथे रोरो सेवेने आगमन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग, नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर पथक चौलकडे जात असताना वाटेत वीजेचे खांब बसवण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने महावितरण करत होते. त्यामुळे रस्ता पूर्णत: बंद झाला होता. त्यावेळी, केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता मोकळा करा असे पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांना सांगितले. तेंव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले १५ दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गोंधळ घातला. तेव्हा प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यावर रस्ता मोकळा करण्यात आला. हे पथक नुकसानग्रस्त नारळ, सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघून जात होते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता रोखला आणि आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

केंद्रीय पथक अलिबाग, नागाव, चौलहून बोर्ली आणि काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते; परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे या पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडक डे रवाना होणाºया या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच रोखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे, पंकज दळवी, विशाल चोरघे, श्रद्धा गद्रे, उदय खोत, सतीश देशपांडे, विलास ठोसर, रमेश चौलकर, सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. ही मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले.

त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. १७ जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. १८ जून रोजी दापोलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून रो-रो सेवेने मुंबईला रवाना होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पथकात समाविष्ट अधिकारी
केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता (संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस.मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर) आणि अनशुमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते, वाहतूक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

Web Title: Central team stopped in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.