चाफेवाडीत 70 आदिवासी कुटुंबांनी श्रमदानातून बंधाऱ्यात साठवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:56 AM2020-12-14T00:56:11+5:302020-12-14T00:56:19+5:30

६० मीटरचा बंधारा : आठ झडपा केल्या बंद; पाणीटंचाईची समस्या होणार दूर

In Chafewadi, 70 tribal families stored water in the dam through labor | चाफेवाडीत 70 आदिवासी कुटुंबांनी श्रमदानातून बंधाऱ्यात साठवले पाणी

चाफेवाडीत 70 आदिवासी कुटुंबांनी श्रमदानातून बंधाऱ्यात साठवले पाणी

googlenewsNext

n विजय मांडे
कर्जत : पाणी समस्येवर मात करण्यासाठी चाफेवाडी आदिवासी वाडीवरील ७० कुटुंबांनी श्रमदान केले. आदिवासी ग्रामस्थांनी लहान मुलांसह एकत्र येत ६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या आठ झडपा बंद करून घेतल्या. दिवसभर केलेल्या श्रमदानातून त्या बंधाऱ्यात आणि परिसरात पाणीच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार नसल्याचे दिसून येते.
खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, पादिरवाडी, पेटारवाडी, घुटेवाडी या ठिकाणी पिण्याचे पाणी मे आणि जून महिन्यात जमिनीत घुसून शोधावे लागते, कारण चाफेवाडीची उपनदी उन्हाळ्यात कोरडी पडते. मग डवरे खोदले जातात आणि त्यातून घरी पाणी नेले जाते. त्या भागात एक किलोमीटर अंतरात किमान चार ठिकाणी कोल्हापूर टाइपचे सिमेंट बंधारे आहेत. त्यातील दोन बंधारे तर २०१७ मध्ये किमान ५० लाख रुपये खर्च करून बांधले आहेत. मात्र नवीन दोन आणि जुने दोन असे सर्व सिमेंट बंधारे हे पाणी गळतीमुळे कुचकामी ठरत आहेत. पाणी जमिनीखालून वाहून जात असल्याने मग जानेवारी उजाडला की पाणी राहत नाही .
फेब्रुवारी महिना सुरू झाला की येथील चाफेवाडीमधील आदिवासी लोक कोरड्या नदीमध्ये खोदलेल्या डवऱ्यामधून पाणी नेऊ शकत होते. मात्र जून महिन्यात नियोजित काळात पाऊस आला नसल्याने मग डवरे हे जमिनीमध्ये खोलवर पाणी शोधण्यासाठी खोदले जातात. त्या वेळी नदीमधील खडक असलेल्या ठिकाणी पाण्याचे झरे आढळून येत असल्याने मग ते पाणी शोधण्यासाठी आदिवासी लोक पाच फूट सहा फूट खोल पाणी शोधत खड्डे खोदत असतात. पोश्री आणि चिल्लार नदीमध्ये आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे. ग्रामस्थ हे चार-पाच जण मिळून असे खोल खड्डे खोदून पाणी शोधून ठेवतात आणि मग आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी चार चार तास बसून पाणी गोळा करतात.
पाणीटंचाईची ही समस्या काही काळासाठी दूर करण्यासाठी १० डिसेंबर रोजी चाफेवाडीमधील सर्व ७० घरांतील प्रत्येकी एक व्यक्ती उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नदीवर एकत्र आले होते. सकाळपासून सुरू झालेल्या श्रमदानामुळे साधारण ६० मीटर लांबीचा आणि आठ दरवाजे असलेला सिमेंट बंधारा सायंकाळी पाण्याने भरून गेला. ४०-४५ महिला, सोबत ५० हून अधिक पुरुष आणि ३५-४० लहान मुले यांच्यामुळे चाफेवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नदीवर गर्दी दिसून येत होती. ग्रामस्थांनी दिवसभर तेथेच थांबून बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधील पाणी जाण्याच्या वाटा बंद करून टाकल्या. हे श्रमदान आदिवासी वाडीमधील तरुणवर्गाने दुंदा हिंदोळा, नीलेश मारुती खंडवी, लहू मालू खंडवी, योगेश खंडवी, पोलीस पाटील किसन सीताराम खंडवी, भाऊ हिंदोळा यांच्या पुढाकाराने यशस्वी झाला.   

सिमेंट बंधाऱ्यात साचले १०-१२ फूट पाणी 
चाफेवाडीमधील आदिवासी कुटुंबांनी एकत्र येत केलेल्या श्रमदानामुळे जानेवारी महिन्यात कोरड्या पडणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यात किमान १०-१२ फूट पाणी साचून राहिले आहे. पाण्याची पातळी लक्षात घेता चाफेवाडी ग्रामस्थांना उन्हाळ्यात लवकर नदीमध्ये डवरे खोदण्याची वेळ येणार नाही.

वाडीमधील महिलांना मार्च महिना सुरू झाला की कोरड्या पडणाऱ्या नदीत खड्डे खोदावे लागतात ही बाब लक्षात घेऊन आम्ही कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना नदीमध्ये एक जागा दाखवली असून तेथे विहीर मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्या ठिकाणी मे महिन्यात पाच फूट खोदले तरी पाणी असते.
- दुंदा हिंदोळा, ग्रामस्थ

Web Title: In Chafewadi, 70 tribal families stored water in the dam through labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.