नुकसान भरपाईसाठी ओएनजीसीविरोधात साखळी उपोषणाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:58 PM2023-09-14T13:58:34+5:302023-09-14T13:59:25+5:30
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तेलगळती झाली.
- मधुकर ठाकूर
उरण : तेलगळती संदर्भात स्थानिक शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (१४) बोलाविण्यात आलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली.यामुळे ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध आंदोलन सुरू करून साखळी उपोषण सुरू केले आहे.
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तेलगळती झाली. तेलगळतीमुळे शेतकरी, मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या शेतकरी, मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी तहसिलदारांनी पंचनामेही केले आहेत.नुकसान भरपाई देण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाबरोबर गुरुवारी (१४) एकत्रितपणे चर्चा करण्याचाही निर्णय तहसीलदारांनी जाहीर केला होता.
मात्र नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अचानक गुरुवारी घेण्यात येणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याचा निरोप तहसीलदारांनी पाठविला. त्यामुळे शेतकरी व मच्छीमारांची फसवणूक होत असल्याची भावना नुकसानग्रस्तांमध्ये पसरली आहे. त्यामुळेच गुरुवारी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करीत साखळी उपोषण सुरू केले असल्याची माहिती समितीचे नेते काका पाटील यांनी दिली.
या साखळी उपोषणात उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. सागर कडू, वैभव कडू, जनाधर थळी, संतोष कडू, स्वप्निल घरत, आशिष काठे, भुपेश कडू आणि महिलांही सहभागी झालेल्या आहेत. दरम्यान अचानक उच्च न्यायालयात काम निघाल्याने गुरुवारी बोलाविण्यात आलेली बैठक तात्पुरती रद्द करुन स्थगित करण्यात आली आहे.ही बैठक पुन्हा कधीही घेतली जाईल असे स्पष्टीकरण उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिले आहे.