दत्ता म्हात्रेपेण : महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा करणाऱ्या गणेशभक्तांची संख्या महाराष्ट्र राज्यासह देश-विदेशात फार मोठी आहे. पेणमध्ये १,२०० गणेशमूर्ती निर्माण करणाऱ्या कारखान्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती निर्माण करणे शक्य होते. आता पीओपीच्या गणेशमूर्ती निर्माण करण्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बंदी घालण्यात आल्याने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण करणे व ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचे आव्हान कसे पेलवणार, ही मोठी समस्या मूर्तिकारांसमोर नव्या वर्षांत उभी राहणार आहे. यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, या विवंचनेत सध्या मूर्तिकार आहेत.
मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रीय नियम आहे. शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे काम मोठे अवघड असते. मूर्ती साच्यातून काढल्यावर दोन दिवसांनंतर ती कोरकाम करून पाण्यानें फिनिशिंग करून गणपतीचे अलंकार, हात, सोंड व इतर सजावट हे अत्यंत जिकिरीचे काम कारागीराला हाताने करावे लागते. मूर्ती तयार झाल्यावर ती सुखरूप ठिकाणी ठेवून उन्हात सुकवून अलगदपणे स्टोअर्स करावी लागते. शाडू माती ठिसूळ असल्याने मूर्ती इकडे तिकडे न हलवता ठेवावी लागते. त्यानंतर, रंगकाम करुन पुन्हा सुखरूप ठिकाणी ठेवावी लागते.
अशा प्रकारे महिन्याकाठी २०,००० ते २२,००० गणेशमूर्ती बनविता येतील, असे जाणकार तज्ज्ञ मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यानुसार, १,२०० कारखान्यात एका महिन्यांत २०,००० ते २२,००० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची निर्मिती करता येईल. मूर्ती निर्माण करण्यासाठी अवघे नऊ महिने काम करायला मिळते. मे महिन्यानंतर जूनपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत मातीकाम पावसामुळे बंद ठेवण्यात येते. अवघ्या नऊ महिन्यांत प्रति महिना २२ हजार, याप्रमाणे १ लाख ९८ हजार दोन फूट उंचीच्या व त्यापेक्षा लहान साइजच्या मूर्ती निर्माण करता येतील. बाजारपेठेतील मागणी फार मोठी आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख इकोफ्रेंडली गणेशमूर्ती पेण शहर व हमरापूर, जोहे या मूर्ती निर्माण करणाऱ्या कला केंद्रात तयार होतात. अनेक संकटांचा सामना करीत ही मूर्तिकला पेणच्या गणेशमूर्तिकारांनी जिवंत ठेवली आहे, पण आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आल्याने २० ते २५ लाख मूर्तींची डिमांड कशी पूर्ण करता येणार, यामुळे इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण करण्याचे मोठे आव्हान मूर्तिकारांसमोर उभे राहिले आहे.
इकोफ्रेंडली त्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम संयमाने हळुवारपणे करावे लागते. शाडू माती ठिसूळ असल्याने मूर्ती सुकल्यावर काळजीपूर्वक स्टोअर्स करावी लागते. मूर्ती उचलताना काळजी घेऊन ठेवली जाते. गोल्ड सोनेरी कलर ठरावीक वेळेत लावावे लागते, नाहीतर गोल्डन कलरला काळपटपणा येतो. मातीकाम कुशलतेने करावे लागते, तरीही बाजाराची इकोफ्रेंडली मूर्तीची जी मागणी आहे, ती पन्नास ते साठ टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - दीपक समेळ, मूर्तिकार, पेण