महाडमध्ये डेंग्यू नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान
By Admin | Published: August 12, 2015 12:33 AM2015-08-12T00:33:30+5:302015-08-12T00:33:30+5:30
डेंग्यूग्रस्त शहर म्हणून आरोग्य विभागाने घोषित केलेल्या महाड शहरातील डेंग्यूचा फै लाव रोखण्याचे नगरपरिषद आणि आरोग्य विभागापुढे एक आव्हान ठरत आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सुरू झालेले
- संदीप जाधव, महाड
डेंग्यूग्रस्त शहर म्हणून आरोग्य विभागाने घोषित केलेल्या महाड शहरातील डेंग्यूचा फै लाव रोखण्याचे नगरपरिषद आणि आरोग्य विभागापुढे एक आव्हान ठरत आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सुरू झालेले हे डेंग्यूचे थैमान उपाययोजना करूनही थांबत नसल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे तंत्र शहरातील काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून वापरले असून, याठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. साध्या तापाच्या रुग्णालाही वीस ते पंचवीस रुपये एमआरपी असलेली सलाईन लावली जात आहे. यासाठी रुग्णांकडून अडीच ते चार हजार रुपयेपर्यंत शुल्क आकारले जात आहेत. शहरातील सर्व खाजगी दवाखाने व पॅथॉलॉजी लॅबमध्ये रुग्णांची मोठी गर्दी आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसलेल्या रुग्णांची शासकीय ग्रामीण रुग्णालयात अक्षरश: रीघ लागली आहे. दररोज या ठिकाणी पाचशेहून अधिक बाह्यरुग्ण तपासणी केली जात आहे. तर वैद्यकीय अधीक्षक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर त्याचा प्रचंड ताण पडत असून हीच परिस्थिती कायम राहिली तर ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.
शहराबरोबरच गावांतही डेंग्यूचे लोण पसरत असून तालुक्यातील सर्व १६४ ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. स्वच्छतेबाबत कठोरपणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.