वेळापत्रक सांभाळण्याचे एसटीसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:54 PM2019-05-21T22:54:03+5:302019-05-21T22:54:15+5:30

ग्रामीण भागाचा एकमेव आधार : कामगारांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात महामंडळाला श्रीवर्धन आगारात अपयश

Challenge ST to handle the schedule | वेळापत्रक सांभाळण्याचे एसटीसमोर आव्हान

वेळापत्रक सांभाळण्याचे एसटीसमोर आव्हान

Next

अरुण जंगम


म्हसळा : चला म्हसळा, माणगाव, कोलाड, पेण, मुंबई... मास्तर हा जेवणाचा डबा माझ्या नातवाला द्या... उन्ह वाढतंय एसटी केव्हा येईल... दररोज आमच्याच गाडीचं नाटक... गाडी सुटलीच पाहिजे... माझा पास आहे मी येतो पाठीमागून एसटीने, तुम्ही जा... हे परवलीचे शब्द एसटी स्थानकाच्या परिसरात ऐकायला मिळतात. आज एसटीची वाहतूक आहे म्हणून आम्ही नियमित गाव ते तालुका ये-जा करतो. मात्र, गाडी वेळेवर न आल्यास मानसिक त्रास सहन करावा लागतो; परंतु उशिरा का होईना; पण एसटी नियमित येते, असे गौळवाडी तालुका म्हसळा येथील कृष्णा दिवेकर यांनी सांगितले.


आज ‘लोकमत’च्या माध्यमातून एसटीविषयी चिकित्सकपणे अवलोकन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, सरकारी नोकरदार, शालेय विद्यार्थी व एसटी यांचे अतूट नाते असल्याचा प्रत्यय येतो. राज्यस्तरीय पातळीवर होणाऱ्या वाहतूक स्पर्धेत आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी एसटीने नावीन्याचा स्वीकार केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रातील जनतेच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी एसटी महामंडळाची स्थापना करण्यात आली. रस्ते विकास हा वाहतुकीमधील महत्त्वाचा घटक आहे; परंतु एसटी महामंडळाने गाव तेथे एसटी बस हे सूत्र स्वीकारले ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदाला समर्पक सेवा एसटीने अहोरात्र दिली आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, यात्रा, महोत्सव, टपाल ते निवडणूक सर्वत्र एसटी अविरत सेवा देत आहे.


एसटी हे महाराष्ट्रातील मोठे महामंडळ आहे. मात्र, कामगारांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात महामंडळाला श्रीवर्धन आगारात अपयश येत असल्याचे दिसून येते. श्रीवर्धन आगारातील कामगारांना (कॅन्टीन) भोजनगृह उपलब्ध नाही, तसेच रात्र वस्तीला जाणाºया चालक-वाहकांच्या विश्रांतिगृहाचा गंभीर प्रश्न आहे. श्रीवर्धन आगाराचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही.


कामगार विश्रांतिगृहातील नव्याने बांधलेल्या प्रसाधनगृहातील एक शौचालय खराब झाले आहे. स्थानकाच्या परिसरातील बांधलेल्या प्रसाधनगृहाची तर बिकट अवस्था झाली आहे. नळ तुटले आहेत, काचा निघाल्या आहेत, तर प्रवासी पेयजलाच्या टाकीची स्वच्छता सफाईकामगार करत नाहीत असे दिसून येते. कामगार अनेक अडचणींना तोंड देत असल्याचे दिसून येते. श्रीवर्धन आगाराच्या अख्यत्यारीत येणाºया म्हसळा, बोर्लीपंंचतन व दिघी या स्थानकात प्रवासीवर्गासाठी पेयजल सुविधा उपलब्ध नाही.


म्हसळ्यातील आरक्षण कक्षासमोरील फरशी अनेक दिवसांपासून तुटली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हसळा व श्रीवर्धन स्थानकांच्या परिसरात खासगी अनधिकृत वाहतूक राजरोसपणे चालते; परंतु त्याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात एसटीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नावीन्याचा स्वीकार करून पावले टाकावी लागणार आहेत.


श्रीवर्धन आगारातील सर्व गाड्या नियमित सोडल्या जातात. मात्र, काही गाड्या उशिरा सुटतात त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. वाहतूककोंडी, तांत्रिक बिघाड व मनुष्यबळाचा अभाव या सर्वांचा परिणाम एसटीच्या वेळापत्रकावर होतो.

श्रीवर्धन आगारातील कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
च्आजमितीस श्रीवर्धन आगारात चालक ८३, चालक-वाहक ५६, वाहक १२७, यांत्रिक कर्मचारी ४९, व इतर प्रशासकीय कर्मचारी २७ असे ३४२ कर्मचारी कार्यरत आहेत. श्रीवर्धन आगाराच्या नियमित सुटणाºया ७० बसेस असून २५० फेºयांची सुरुवात येथून होते. श्रीवर्धन आगारात आज रोजी ४५ लाल, २१ सेमी व चार शिवशाही बस उपलब्ध आहेत.


च्श्रीवर्धन हा दुर्गम भागातील तालुका आहे. आज ही येथील ग्रामीण भागातील रस्त्यांचे पूर्णत: डांबरीकरण झालेले नाही. साखरोणे, सांगवड, कोळवट, भापट, गडबवाडी, केळेवाडी हे रस्ते वाहतुकीस योग्य नाहीत, तरीसुद्धा या भागात एसटीची नियमित वाहतूक चालते. रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, दिघी, कुडगाव, बोर्लीपंचतन, वांजळे, सर्वा, आदगाव, तोराडी, सुतारवाडी, कोलवट, सांगवड ही गावे पूर्णपणे वाहतुकीसाठी एसटीवरती अवलंबून आहेत. या मार्गावर एसटीला चांगले उत्पन्न मिळते.
 

श्रीवर्धन आगारातील सर्व गाड्या नियमित सोडल्या जातात. वाहतूक कर्मचाºयांची कमतरता, यामुळे अपवादात्मक परिस्थितीत एखादी बस उशिरा सुटते. या उन्हाळी हंगामात आम्ही जवळपास नियमित ३००० कि.मी. दररोज जादा वाहतूक केली आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा पुरावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढच्या महिन्यात विभाग बदली झालेल्या वाहकांना कार्यमुक्त केल्यावर त्याचा थोडा फार परिणाम वेळापत्रकावर होऊ शकतो. तरीसुद्धा आम्ही सर्वोपरी चांगली सेवा निश्चित देऊ.
- रेश्मा गाडेकर, आगारप्रमुख, श्रीवर्धन

श्रीवर्धन आगारात वाहक वापरत असलेले ट्रायमॅक्स मशिन २००९ मध्ये खरेदी केलेले आहेत. मशिनचे सर्व भाग खराब झाले आहेत. वाहकांना कामगिरी बजावताना अनेक अडचणी येतात; परंतु प्रशासन लक्ष घालत नाही. तसेच ट्रायमॅक्स कंपनीकडून तिकिटासाठी देण्यात येणारे रोल अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत, त्यामुळे तिकिटावर प्रिंट व्यवस्थित येत नाही.
- लक्ष्मण पाटील, सचिव, कामगार संघटना, श्रीवर्धन आगार


श्रीवर्धन आगारातील रात्री वस्तीला जाणाºया चालक-वाहकांना रात्रवस्तीला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. कोळवट वस्तीचा अपवाद वगळता इतर सर्व रात्रवस्तीला उघड्यावर नैसर्गिक विधीला जावे लागते. पावसाळी गवत वाढल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. रात्रवस्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत.
- संदीप गुरव, अध्यक्ष,
एसटी कामगार सेना, श्रीवर्धन

Web Title: Challenge ST to handle the schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.