जयंत धुळप ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा निवडणुकीच्या आजवर झालेल्या १६ निवडणुकांपैकी १९५२ ते २००४ या १४ निवडणुकींत येथील परिवर्तनशील सुज्ञ मतदारांनी सलग कुणा एका पक्षाच्या उमेदवारास खासदार म्हणून निवडून न देता, १४ निवडणुकीत आलटून पालटून काँग्रेस आणि शेकाप या दोनच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कौल दिला आहे. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत या मतदारांनी हे सूत्र बदलून काँग्रेस वा शेकाप यांच्या पैकी एका पक्षाच्या उमेदवारास सलग दोन वेळा खासदार बनवून अधिक काम करण्याची संधी दिली. परिणामी, १९९१ आणि १९९६ या दोन निवडणुकांत सलग दोन वेळा काँग्रेसचे, १९९८ आणि १९९९ या दोन निवडणुकांत सलग दोन वेळा शेकापचे, तर २००९ आणि २०१४ या दोन निवडणुकांत शिवसेनेचे अनंत गीते खासदार झाले. आताच्या निवडणुकीत हेच सूत्र मतदारांनी ठेवले तर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे सुनील तटकरे यांना संधी मिळू शकते, असा येथील राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.रायगडचे विद्यमान खासदार अनंत गीते यांना २०१४ च्या निवडणुकीत या लोकसभा मतदार संघातील पेण, महाड आणि दापोली या तीन विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले होते. मात्र, आता पेणमध्ये शेकापचे तर दापोलीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांनी तटकरे यांना मताधिक्य देण्याचा चंग बांधला आहे. महाडमध्ये विद्यमान आमदार शिवसेनेचे भरत गोगावले असले तरी येथील माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी तटकरेंकरिता व्यूहरचना केली आहे.२०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना अलिबाग, श्रीवर्धन आणि गुहागर या तीन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. त्या वेळी त्यांच्याविरोधात शेकापचे रमेश कदम होते व त्यांना एकूण एक लाख २९ हजार ७३० मते मिळाली होती. तर नामसाधर्म्यते अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना २१०० मते मिळाली होती. आता परिस्थिती बदलली असून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीच तटकरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. शिवाय, अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, विद्यमान आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, दापोलीचे आमदार संजय कदम व गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे तटकरे यांच्या सोबत आहेत.
अनंत गीते यांना सुनील तटकरेंचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:01 AM