अठरा वर्षांवरील साडेचार लाख नागरिकांना लस देण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:52 PM2021-04-21T23:52:07+5:302021-04-21T23:53:59+5:30
नवी मुंबई पालिकेची तयारी पूर्ण : लस उपलब्ध होत नसल्याने पडतोय खंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबईमध्ये साडेचार लाख नागरिकांना लस घेता येणार आहे.
महानगरपालिकेने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे; परंतु शासनाकडून लस वेळेत मिळत नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस पुरविण्यात अडथळे येत असून, अशीच स्थिती राहिली तर सर्व प्रौढांना लस कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ५२ लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. प्रतिदिन ७ हजार पेक्षा जास्त नागरिकांना लस देता येईल, अशी यंत्रणा तयार केली आहे. भविष्यात प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देता येईल, अशी यंत्रणा लवकरच तयार केली जाणार आहे.
शहरात १८ वर्षांवरील साडेचार लाख नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासकीय तयारी असली तरी या सर्वांसाठी लस उपलब्ध होणार का, असा प्रश्न आहे. सद्य:स्थितीमध्ये वारंवार लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. आहे तीच केंद्रे लस नसल्याने बंद करावी लागत असून, १ मे पासून सर्व प्रौढांना लस कशी द्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार
शहरात सद्य:स्थितीमध्ये ५२ लसीकरण केंद्रे आहेत. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्यामुळे अजून केंद्र वाढविण्यात येणार आहेत. प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देता येईल, असे नियोजन महानगरपालिकेने केले असून, त्यासाठी नवीन केंद्रे वाढविण्याचीही तयारी केली आहे.
ज्येष्ठांचाही सहभाग वाढला
लसीकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग समाधानकारक आहे. शहरात आतापर्यंत ५८२५९ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. १०४९५ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. वाशीमधील एक ९९ वर्षांच्या आजीबाईंनीही लस घेतली आहे. लसीचा तुटवडा दूर करण्याची मागणीही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
४५ वर्षांवरील ७४ हजार नागरिकांनी घेतली लस
शहरात ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचा लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ७४५८३ जणांनी लस घेतली आहे.
लसीचा साठा संपल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही लस घेता येत नाही. केंद्रावरून अनेकांना परत जावे लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
३७ हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस
शहरात आतापर्यंत १ लाख ९० हजार ५६३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. यापैकी ३८९२५ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
१५२७५ आरोग्य कर्मचारी, ८१७७ फ्रंटलाइन वर्कर, ३९७८ सहव्याधीग्रस्त, १०४९५ ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत दुसरा डोस घेतला आहे.
पुन्हा संपला साठा
nमहानगरपालिकेला मंगळवारी लसीचे फक्त तीन हजार डाेस मिळाले होते. बुधवारी दुपारी लसीचे डोस संपल्यामुळे अनेक केंद्रे बंद करावी लागली आहेत.
nनवीन डोस आले तरच गुरुवारी लसीकरण सुरू करता येणार आहे. लस मिळाली नाही तर लसीकरण बंदच राहणार आहे.