जिद्द आणि योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:08 AM2019-10-27T00:08:39+5:302019-10-27T00:09:04+5:30

महायुतीचा विजय। निकाला वेळी आभाळ फाटल्यागत झाली होती राष्ट्रवादीची परिस्थिती

Change in Karjat constituency due to stubbornness and proper planning | जिद्द आणि योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

जिद्द आणि योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

Next

कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, अशी भाकिते होत होती; परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत मात्र थोरवे यांनी एक लाखा पेक्षा जास्त मते मिळवून विक्रमच केला आहे; त्यामुळे ते ‘जायंट किलर’ ठरले. ‘आभाळच फाटलेय त्याला ठिगळ कुठे कुठे लावायची’ अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात झाल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून आले.

मागील निवडणुकीत लाड आणि थोरवे यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये नवख्या असलेल्या महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेतकरी कामगार पक्षची उमेदवारी मिळविली आणि सर्व नाराज शिवसैनिकांना बरोबर घेत तब्बल ५५ हजार मतांपेक्षा जास्त मते घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या १९०० मतांनी पराभव झाला होता. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हनुमंत पिंगळे यांना मोठ्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर फेकले. विजया समीप आलेल्या थोरवे यांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा शिवबंधन बांधून चार सव्वा चार वर्षे शिवसेनेची बांधणी केली. या कालावधीत माथेरान, कर्जत नगरपालिकेत सत्तांतर करून शिवसेनेचे नगराध्यक्ष बसविले. तसेच नेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला.

निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच नाराज असलेल्या हनुमंत पिंगळे यांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. दोनच दिवसांनी शिवबंधनात अडकलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे स्वगृही परतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्धार मेळाव्याचे आयोजन करून सुरेश लाड यांना पाठिंबा जाहीर केला. महायुतीचे उमेदवार थोरवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि शेवटी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन केलेली तालुका कार्यकारिणीची बरखास्ती आणि सुरेश लाडांना दिलेला पाठिंबा या साºया मुळे लाडांचे पारडे जड झाल्यासारखे वाटले. या घटनांमुळे महाआघाडी भक्कम झाल्याचे वातावरण तयार झाल्या सारखे वाटले. ‘भाऊ जुना खिलाडी आहे आयत्या वेळी काही करील.’ अशा वल्गना केल्या त्यांचेही दात पडले. तसे पाहिले तर त्यांचेही काही चुकले नाही अनुभवाचे बोल त्यांनी बोलून दाखविले. बेरजेचे गणित कागदावरच राहिले. नेत्यांच्या भूमिकेला कार्यकर्ते किंवा मतदारांनी साथ दिली नाही. हे निकालाअंती चांगलेच समजले.

निवडणुकीच्या मतदानाच्या वेळीसुद्धा बुथवरील परिस्थिती यावरून सुद्धा अनेकांनी अंदाज बांधले; परंतु प्रत्यक्ष मतमोजणीत भलतेच घडले. सर्वांचेच आखाडे चुकले. प्रत्येक मतदान केंद्रावर आघाडी मिळवीत थोरवे यांची विजयाकडे होत असलेली घोडदौड लाड रोखू शकले नाहीत.

विजयाची हॅट्ट्रिक हुकली
तब्बल १८ हजार मतांच्या वर मताधिक्य घेऊन महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत पाऊल ठेवले यात त्यांचे मोठे बंधू माजी उपसभापती मनोहर थोरवे यांचे अथक परिश्रम आहेत. त्यांनी नियोजनाकडे लक्ष घातले. त्यांनी मागील वेळी निसटता पराभव कोणत्या कारणाने झाला याचा अभ्यास करून त्या - त्या भागात संपूर्ण लक्ष केंद्रित करून तेथील मते आपल्याकडे कशी येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला महायुतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. स्वत: उमेदवार महेंद्र थोरवे यांनी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने निवडणूक रिंगणात उडी घेऊन विजयश्री सहज खेचून आणली आणि मतदार संघातील विजयाची हॅट्ट्रिक न करून देण्याची परंपरा कायम राखली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांंना आत्मचिंतनाची गरज आहे.

Web Title: Change in Karjat constituency due to stubbornness and proper planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.