रायगडचा मतदार परिवर्तनशील...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:07 AM2019-04-07T00:07:59+5:302019-04-07T00:08:20+5:30

दोन्ही पक्षांना पसंती : १६ पैकी १४ निवडणुकीत काँग्रेस आणि शेकापला आलटून पालटून केले विजयी

Change of voters of Raigad ...! | रायगडचा मतदार परिवर्तनशील...!

रायगडचा मतदार परिवर्तनशील...!

Next

- जयंत धुळप 


अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या आजवर झालेल्या १६ निवडणुकांपैकी १९५२ ते २००४ या १४ निवडणुकींत तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदार संघातील परिवर्तनवादी सुज्ञ मतदारांनी सलग कुणा एका पक्षाच्या उमेदवारास खासदार म्हणून निवडून न देता, ‘भाकरी तव्यावर उलटली तर करपत नाही’ या सूत्रानुसार आलटून पालटून काँग्रेस आणि शेकाप पक्ष या दोनच ्रपक्षांच्या उमेदवारांना खासदार म्हणून दिल्लीत पाठविले आहे.


१९५२ ते १९८९ या निवडणुकांत आलटून पालटूनचे सूत्र तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अबाधित राखले. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत हे सूत्र थोडे बदलून काँग्रेस वा शेकाप यांच्यापैकी एका पक्षाचा उमेदवार सलग दोन वेळा खासदार बनवून अधिक काम करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, १९९१ आणि १९९६ या दोन निवडणुकांत सलग दोन वेळा काँग्रेसचे खासदार झाले तर १९९८ आणि १९९९ या दोन निवडणुकीत सलग दोन वेळा शेकापचे खासदार झाले आणि २००४ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा खासदार दिल्लीत पाठविला.


कुलाबा मतदार संघातील मतदारांना आजमावण्याचा शिवसेनेने पहिला प्रयत्न १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत केला; परंतु शिवसेनेला कुलाब्याच्या मतदारांनी स्वीकारले नाही. हाच प्रयत्न पुन्हा शिवसेनेने १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत केला; परंतु कुलाब्याच्या मतदारांनी शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर टाकले.


२००९ मध्ये लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि पूर्वीचा ‘कुलाबा’ हा ‘रायगड’ लोकसभा मतदारसंघ झाला आणि तब्बल १४ लोकसभा निवडणुकीत सातत्याने आलटून पालटून काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारास कौल दिलेल्या कुलाब्याच्या मतदारांत विभाजन झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहाघर हे दोन विधानसभा मतदार संघ रायगडमध्ये आले, तर उरण, पनवेल व कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ कुलाब्यातून मावळमध्ये गेले.


परिणामी, १९९६ पासून २००४ पर्यंतच्या चार लोकसभा निवडणुकीत सातत्याने अपयशाला सामोरे जाणाऱ्या शिवसेनेला रायगडच्या मतदारांनी विचारात घेतले आणि २००९ आणि २०१४ या दोन निवडणुकीत रायगडच्या सुज्ञ मतदारांनी अनंत गीते यांना दोन वेळा संधी दिली आहे.

१९९१ मध्ये येथील मतदारांनी, सलग दोन वेळा खासदार बनवून अधिक काम करण्याची संधी एका पक्षाच्या खासदारास देण्याचे जे सूत्र स्वीकारले, तर यंदाच्या निवडणुकीत, आलटून पालटून काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारास दिल्लीत पाठविणारा हा रायगडचा परिवर्तनवादी सुज्ञ मतदार, कोणत्या उमेदवाराला कौल देतो, याबाबत राजकीय चर्चा रंगत आहेत.

Web Title: Change of voters of Raigad ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :raigad-pcरायगड