बदललेली आसनव्यवस्था जिल्हा परिषदेसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:25 AM2018-12-03T00:25:51+5:302018-12-03T00:26:06+5:30
रायगड जिल्हा परिषदेमधून पंचायत राज समिती जाऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी लोटला आहे
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधून पंचायत राज समिती जाऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी लोटला आहे, परंतु त्या समितीचे पडसाद अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनामध्ये दिसून येत आहेत. पंचायत राज समितीसाठी त्यावेळी कोट्यवधी रुपयांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यांच्याच सोयीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या प्रशासकीय इमारतीमधील ना.ना. पाटील सभागृहातील अंतर्गत आसन व्यवस्थेची फेररचना करण्यात आली होती. तीच आता प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय झाली आहे. फेररचनेमुळे ७ डिसेंबर रोजी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खोपोली येथील एका रिसॉर्ट येथे पार पडणार असल्याची चर्चा आहे.
राज्याचा कारभार चालवण्यासाठी दिशा ज्या विधिमंडळातून केली जाते त्याच धर्तीवर जिल्ह्याचा कारभार चालावा यासाठी प्रभाकर पाटील यांनी मोठ्या जिद्दीने शिवतीर्थ इमारत अलिबाग येथे उभी केली होती. राज्यकारभार करताना नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे, सर्वसाधारण सभा घेणे, अर्थसंकल्प सादर करणे यासाठी शिवतीर्थ इमारतीमधील सभागृह देखील राज्याला लाजवेल असेच आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी, संबंधित उपमुख्यकार्यकारी अधिकारी, लेखाधिकारी, विविध खात्याचे सभापती हे व्यासपीठावर विराजमान होतात, तर जिल्हा परिषदेचे ५९ सदस्य आणि १५ पंचायत समितीचे सभापती हे व्यासपीठासमोर बसतात. त्याचप्रमाणे पत्रकारांनाही बसण्यासाठी समोरच व्यवस्था करण्यात आली होती.
शिवतीर्थावरील सभागृह पाहिल्यावर विधिमंडळाची आठवण व्हायची, परंतु आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी पंचायत राज समिती दौऱ्यावर आली होती. त्यामध्ये सुमारे विविध राजकीय पक्षाचे १७ आमदारांचा समावेश होता. त्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेने कोणतीच कसूर केली नाही. पंचायत राज समिती येणार म्हणून त्यांनी चक्क ना.ना.पाटील सभागृहाची आसन व्यवस्था पार बदलून टाकली. त्यांच्यासाठी राऊंड टेबल लावण्यात आले, तसेच चकचकीत कारपेट अंथरण्यात आले होते.
पंचायत राज समिती ज्या उद्देशासाठी जिल्ह्यात आली होती तो उद्देश सफल झाल्यावर निघून गेली. मात्र ज्या ना.ना.पाटील
सभागृहाची आसन व्यवस्था बदलली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नियमित सभा तेथे घेणे अशक्य झाल्याचे दिसून येते. रचना बदलण्यात आल्यामुळे ५९ सदस्य, अधिकारी, सभापती,
पंचायत समितीचे सभापती, विविध अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना सद्य ठिकाणी बसणे अशक्य आहे.
>जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट
७ डिसेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा शिवतीर्थावर न घेता रिशीवन रिसॉर्टवर घ्यावी लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे. पनवेल महानगर पालिका अस्तित्वात आल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे सुमारे ४० टक्के उत्पन्न घटले आहे. त्यामुळे विविध विकासकामे करताना जिल्हा परिषदेला फारच कसरत करावी लागत आहे, असे असताना खासगी रिसॉर्टवर अशा बैठका आयोजित करून काय साध्य होणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील सभा बाहेर घेण्याचा कायदेशीर अधिकार अध्यक्षांना आहे. ते
त्यांच्या अधिकाराचा वापर करून तसा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा सचिव निखीलकुमार ओसवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.