कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 01:08 AM2020-08-08T01:08:35+5:302020-08-08T01:09:16+5:30
पनवेलमधील धक्कादायक प्रकार : नातेवाइकांकडून नाराजी
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील पोदी स्मशानभूमीत कोविडच्या मृतांवर अंत्यविधी केल्यानंतर २,५०० रुपयांची आकारणी केली असल्याचा आरोप येथील मृतांच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. जासई येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे १ आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्यावर, त्यांच्यावर पोदी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले होते.
पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय व एमजीएम रुग्णालय ही दोन कोविड रुग्णालये आहेत. या ठिकाणी कोविडने मृत पावलेल्या मृतदेहांवर नवीन पनवेल येथील पोदी व पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी केले जातात. खासगी संस्थेच्या पुढाकाराने पोदी येथील गॅसवरील शवदाहिनी चालविली जात आहे. मात्र, कोविडच्या मृतदेहावरील अंत्यविधी करताना, त्यांच्या नातेवाइकांकडून पैशाची आकारणी करणे चुकीचे असल्याचे रूपेश भोईर यांचे म्हणणे आहे. अंत्यविधीच्या वेळी भावुक झालेले नातेवाईक पैशांबाबत विचारणा करीत नसले, तरी ही पद्धत चुकीची असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.
याबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांना विचारणा केली असता; त्यांनी संबंधित शवदाहिनी खासगी संस्था चालवित आहे. ती शवदाहिनी कार्यान्वित करण्यासाठी लागणारा गॅस, मनुष्यबळ याकरिता ही संस्था निधी आकारात असते. पालिकेमार्फत ही पैशाची आकारणी केली जात नसल्याचे गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासनाने निधी द्यावा
कोविडच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी लागणारा खर्च शासनाच्या आस्थापनांनी करण्याची आवश्यकता आहे. संबंधित स्मशानभूमी खासगी संस्थांमार्फत कार्यान्वित असल्या, तरी शासनामार्फत या संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खासगी संस्थेचा प्रताप : पोदी आणि अमरधाम स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात, पण पोदीतील स्मशानभूमीचे काम खासगी संस्थेकडून होत असल्याने ते गॅस, मनुष्यबळासाठी पैसे आकारत आहेत.