- अंकुश मोरे वावोशी : चौक ग्रामपंचायतीने पथदिवे खरेदी प्रकरणात दुप्पट पैसे मोजून एलईडी दिवे खरेदी केल्या प्रकरणी माजी सरपंच व लता कोंडीलकर व ग्रामविकास अधिकरी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा अहवाल खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना पाठविला आहे. सावरोली ग्रामपंचायतीनंतर तालुक्यात चौक ग्रामपंचायतीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.चौक ग्रामपंचायतीने १५ मार्च २०१६ ला मान्यता प्राप्त नामांकित कंपनीचे विविध वॅटचे सुमारे ३०० एलईडी दिवे खरेदीसाठी आॅनलाइन पद्धतीने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार मे.सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा.लिमिटेड या कंपनीला टेंडर मिळाले होते. ४८ वॅटचे १०० एलईडी दिवे प्रतिनग ३९७५ रुपयांना खरेदी करण्यात आले व ३६ वॅटचे २०० एलईडी दिवे प्रतिनग ३१५० रुपये दराने खरेदी करण्यात आले. एकूण १०, २७, ५०० रुपये किमतीच्या मालाची खरेदी चौक ग्रामपंचायतीने केली होती. या खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा गावडे यांनी सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे पती सुरेश गावडे यांच्या निदर्शनास आणले. मे. सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा. लिमिटेडकडे दुकानाच्या नावे ४८ वॅट व ३६ वॅटचे एलईडी दिवे खरेदी केले असता ४८ वॅटचा एलईडी दिवा प्रतिनग २४३० रुपये तर ३६ वॅटचा एलईडी दिवा प्रतिनग १४७० रुपये दराने मिळाला. चौक ग्रामपंचायतीने सुमारे ४,९०,५०० रुपये जास्त दराने खरेदी केल्याचे सुरेश गावडे यांनी माहिती अधिकारातही उघड केले होते. याबाबत चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त कोकण भवन यांच्याशी पत्रव्यवहार करत पुरावे सादर केले होते. विभागीय कोकण आयुक्तांनी सदर तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत निविदा ८,६६,००० रुपये इतक्या रकमेची असतानाही मे. सोर्स वन ल्युमिनिरीज यांची १०,२७,००० इतकी जादा रकमेची निविदा मंजूर केल्याचे चौकशीत उघड झाले. याशिवाय उपसरपंच गणेश कदम यांची मासिक सभेसाठी सही नंतर घेण्यात आल्याची कबुली दिली. तत्कालीन सरपंच लता कोंडीलकर व ग्रामविकास अधिकारी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा ठपका गटविकास अधिकारी यांनी ठेवला.>ग्रामपंचायतीने खरेदीचे कोटेशन मंजूर करताना त्याच्या संबंधित सदस्यांना प्रती दिल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे खरेदी वर्कआॅर्डरला जावक क्र मांक टाकलेला नाही. याबाबत पंचायत समिती खालापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्र ार केली होती; परंतु एकतर्फी चौकशीत प्रकरण निकालात काढल्यामुळे मी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त कोकण विभाग कोकण भवन यांच्या कार्यालयात लेखी तक्र ार अर्ज दिला होता. अखेर या प्रकरणात चौकशीत सत्य समोर आले असून, जनतेच्या पैशांची नासाडी करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.- सुषमा गावडे, सदस्या, चौक ग्रामपंचायत>सदरचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांना पाठविला आहे. त्याबाबत पुढील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे.- संजय भोये, वरिष्ठ गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती
चौक ग्रामपंचायतीत पथ दिवे खरेदी घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 2:32 AM