पुरात भिजलेल्या वाहनांची स्वस्तात विक्री, जाणून घ्या व्हायरल सत्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 01:56 AM2019-11-03T01:56:47+5:302019-11-03T02:20:07+5:30
सोशल मीडियावर व्हायरल । कर्नाळा परिसरात ग्राहकांची गर्दी
पनवेल : पुरात भिजलेल्या वाहनांची स्वस्तात विक्री होत असल्याच्या अफवा पसरल्याने त्या खरेदी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य परिसरात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; परंतु ही निव्वळ अफवा असल्याचे समजताच लोकांनी हळूहळू काढता पाय घेतला. दरम्यान, त्यामुळे येथील वाहनाच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुरात भिजलेल्या गाड्या ४५ टक्के कमी दराने उपलब्ध असल्याचा संदेश बुधवारी व गुरुवारी सोशल मीडियावरून पनवेल परिसरात व्हायरल झाला. त्यामुळे वाहन खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांनी शुक्रवारी कर्नाळा येथील वाहनाच्या गोदामाजवळ एकच गर्दी केली. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेर तेथील कर्मचाºयांनी गोदामाबाहेर फलक लावून अशा प्रकारे वाहनांचा कोणताही सेल नसल्याचे जाहीर केले. त्यानंतरही गर्दी वाढतच गेली. व्हायरल झालेल्या मेसेजबरोबर विक्रीला असलेल्या वाहनांचे फोटोही असल्याने ग्राहकांनी तेथील कर्मचाºयांवर प्रश्नांची सरबती केली. अखेर गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षारक्षकांचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर शनिवारी संबंधित गोदाममालकाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आमच्या माध्यमातून अशा प्रकारचा कोणताही सेल असल्याचे जाहीर केले नव्हेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
व्हॉट्स अॅपवर एका ग्रुपमध्ये मी हा मॅसेज पाहिला. पावसामुळे भिजलेली वाहने ४५ टक्के सूट देऊन मिळत असतील तर पाहवी म्हणून मी चौकशीसाठी गेलो होतो. मात्र, तिथे असा कोणताही प्रकार नसल्याचे कळाले.
- किरण राऊत, पनवेल