किरकोळ बाजारात भाज्यांची स्वस्ताई; आवक वाढल्याने दर निम्म्याने घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:53 PM2020-12-17T23:53:36+5:302020-12-17T23:53:44+5:30
सुधागड तालुक्यातील ग्राहक आनंदी
- विनोद भोईर
पाली : रायगड जिल्ह्यात किरकोळ बाजारात गेले अनेक दिवस भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे
दर निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे ग्राहकदेखील खूश झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी कोथिंबिरीची एक जुडी ४० ते ५० रुपयांना मिळत होती. ती आता अवघी १० रुपयांना मिळत आहे. तब्बल १२० रुपये किलोच्या पुढे गेलेली मटार आता ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक भाजी विक्रेते पुणे मंडई किंवा वाशी बाजारातून भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. कोरोना संकटात ट्रान्सपोर्टचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हमाल व मजूरदेखील उपलब्ध होत नव्हते. यातच भाज्यांची आवकसुद्धा फारच कमी होती. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यादेखील उपलब्ध होत नव्हत्या. अशा विविध कारणांमुळे भाज्यांचे भाव वधारले होते. मात्र सध्या वाहतुकीची चांगली सोय, चांगले हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक आल्याने व माणसे उपलब्ध झाल्याने बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त झाल्या असल्याचे पालीतील भाजी विक्रेत्याने सांगितले. राजमा, जाडी मिरची या काही भाज्या तर मिळतदेखील नव्हत्या. मात्र आता सर्वच भाज्या उपलब्ध होत आहेत.