जिल्हा प्रशासनाने निवडलेला कोविड योद्धा निघाला भामटा; पालकमंत्र्यांनी केला होता सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:11 PM2020-09-19T19:11:36+5:302020-09-19T19:21:35+5:30

स्वातंत्र्य दिनी देण्यात आलेला कोविड योद्धा पुरस्कार काढून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Cheating case registered against covid warrior felicitated by guardian minister aditi tatkare | जिल्हा प्रशासनाने निवडलेला कोविड योद्धा निघाला भामटा; पालकमंत्र्यांनी केला होता सन्मान

जिल्हा प्रशासनाने निवडलेला कोविड योद्धा निघाला भामटा; पालकमंत्र्यांनी केला होता सन्मान

Next

- आविष्कार देसाई                                                                                                        

रायगड: कोणणतीही समिती नाही अथवा कोणाचीही साधी चोकशीही केली नाही. जिल्हा प्रशासनाने 15 ऑगस्टला  कोविड योद्धा पुरस्कारांची खैरात वाटली. यातील गंभीर बाब म्हणजे ज्यांना कोविड योद्धा म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवले त्याच्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे कोविड योद्धा पुरस्काराची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे.

मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; एकूण कर्जाचा आकडा पाहून बसेल धक्का

चुकीच्या पद्धतीने दिलेला पुरस्कार संबंधित व्यक्तीकडून तात्काळ काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, मदतीच्या नावाखाली डॉ. साजिद सैय्यद नावाच्या एका भामट्याने जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सरकारी अधिकारी यांच्यासोबत असलेली जवळीक दाखवून अलिबागेतील व्यापाऱ्यांना तब्बल 18 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने तक्रार दाखल केलेली नसली तरीही, सरकारी अधिकाऱ्यांनीच ओळख करून दिल्यानंतर राजकारणी लोकांमध्येही या भामटयाने जाळे पसरवून त्यांची देखील फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच भामटयाला जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्रदिनी कोव्हीड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. हा भामटा ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगत होता. ती संस्था नोंदणीकृत आहे किंवा कसे ही साधी गोष्ट तपासण्याची गरज पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसिलदार यांना कोणालाही भासली नाही हे विशेष. या भामट्याला देशाच्या स्वातंत्रदिनी पालकमंत्री गौरवितात. भामटयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी हजेरी लावतात. कसलीही सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्था? सरकारकडून एखादयाला गौरविताना त्याची साधी चौकशी पोलीसांमार्फत का करता येत नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.

कोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट

कोविड योद्धा पुरस्काराने गौरवताना पुरस्कारार्थींच्या नावाची शिफारस कोणी केली, त्यासाठी कोणती समिती गठीत केली होती का, कोणते निकष लावले याची माहिती मिळणे गरजेचे आहे. साजिद सारख्या भामट्याला गौरवण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने घाईने पुरस्कार दिल्याने कोविड योद्धा पुरस्कारांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे अॅड. राकेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यापुढे विविध कार्यक्रमांमध्ये पुरस्कार वितरण करताना पालकमंत्र्यांनी देखील खातरजमा करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याहस्ते गौरव म्हणेज राज्य सरकारच्या हस्ते गौरव असा होतो, असेही अॅड. पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका भामट्याला जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री यांच्याहस्ते गौरवल्याने पुरस्काराचे महत्व कमी झाले आहे. ज्यांनी खरोखरच चांगले काम केले, त्यांना याच पुरस्कारने गौरवल्याने त्यांनाही या पुरस्काराबाबत अभिमान वाटेल असे दिसत नाही. शिवाय जिल्हा प्रशासनाच्या कामाची पद्धत कशी मनमानी आहे. हेच यातून अधोरेखित होत असल्याचे बोलले जाते. 

अदिती तटकरे (पालकमंत्री, रायगड)  
कोविड योद्धा पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे. याबाबत माझी मान्यता घेण्यात आली नव्हती. रात्री उशिरा पुरस्कार्थींची थेट यादी मला मिळाली होती. याबाबतीत प्रशासनाने कोणते निकष लावले, समिती गठीत केली होती का, याची माहिती नव्हती. चुकीच्या पद्धतीने दिलेला कोविड योद्धा पुरस्कार तात्काळ काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देत आहे. तसेच या पुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

निधी चौधरी (जिल्हाधिकारी, रायगड)
चांगले काम करणारी स्वयंसेवी संस्था असल्याबाबत आम्हाला इंटरनेटवर त्यांची माहिती मिळाली होती. सुरुवातीला विश्वास संपादन करायचा आणि नंतर फसवणूक करायची अशी त्यांची पद्धत आहे. त्याबाबत संशय आल्याने अधिक तपास केला असता तो फसवणूक करणारा असल्याचे आढळले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.       
 

Web Title: Cheating case registered against covid warrior felicitated by guardian minister aditi tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.