मुंबईच्या उद्योजकाला एक कोटीचा गंडा, जागा देण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:04 AM2018-03-15T03:04:16+5:302018-03-15T03:04:16+5:30
कारखान्यासाठी जागा घेवून देण्याच्या नावाखाली मुंबईचे उद्योजक जॉन चार्लस बॅप्टीस्ट अन्ड्राडे (७२, रा.चेंबूर, मुंबई) यांची स्थानिक दलाल व आणखी दोघा जणांनी सुमारे एक कोटीला फसवणूक केल्याची घटना खालापुरात घडली.
खालापूर : कारखान्यासाठी जागा घेवून देण्याच्या नावाखाली मुंबईचे उद्योजक जॉन चार्लस बॅप्टीस्ट अन्ड्राडे (७२, रा.चेंबूर, मुंबई) यांची स्थानिक दलाल व आणखी दोघा जणांनी सुमारे एक कोटीला फसवणूक केल्याची घटना खालापुरात घडली. तीन आरोपींमध्ये शिवसेनेचा कुंभिवली विभागप्रमुख दीपक मालुसरेला अटक झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
जॉन यांना कंपनीसाठी जागा खरेदी करावयाची असल्याने त्यांचे केअरटेकर केदार दिवेकर (रा. चौल, अलिबाग) याने मौजे कलोते रयती खालापूर येथील जागा खरेदी करून देतो असे सांगून प्रफुल्ल महाडिक (रा.विणेगाव,खालापूर)व दीपक मालुसरे ( शिवसेना विभाग प्रमुख खालापूर) यांच्याशी संगनमत करून १४ जून २०१० ते १२ आॅक्टोबर २०११ दरम्यान जागा खरेदीसाठी बिनशेती करण्यासाठी व इतर कामासाठी जॉन यांच्या कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी विश्वासाने रक्कम घेवून मिळकतीची बिनशेती परवानगी न घेता, ती मिळकत जॉन यांच्या अपरोक्ष केदार दिवेकर याने स्वत:च्या नावे करून घेवून जॉन यांची ९७,९५,००० रु पयांची फसवणूक करून अपहार केला. जॉन यांनी तिघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिल्यानंतर तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.निरीक्षक जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.