- यदु जोशी, मुंबई
कृषी उत्पन्नातील वाढीसाठी जमिनीचा पोत पिकासाठी पोषक असावा. त्यासाठी पिकत्या जमिनीचे नियमित परीक्षण होणे गरजेचे आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता जागृती झाली असून, अनेक शेतकरी स्वत:हून माती परीक्षणासाठी पुढाकार घेत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३० हजार मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी कार्यालयातून आली आहे. नवीन वर्षात जिल्ह्यातील २६ हजार ८०० माती व पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे लक्षांक कृषी विभागाला देण्यात आले आहे. यापैकी कृषी विभागाला २६ हजार १०६ नमुने उपलब्ध झाले आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या मृदा चाचणी प्रयोगशाळेने आतापर्यंत १४ हजार ६१५ माती नमुने तपासले असून, उर्वरित नमुने तपासण्यासाठी अशासकीय मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे.जिल्ह्यात १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिका’ देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत कृषी विभागाने २० हजार ४२२ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले आहे. रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार म्हणून पूर्वी असलेली ओळख या माध्यमातून पुन्हा परत मिळेल, असा विश्वास कृषी संशोधकांना आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होतो. पिकत्या जमिनीतील क्षार व पाण्याची वेळच्या वेळी तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे मातीची तपासणी केल्यास, खतांचा वापर, उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे. पीक उत्पादनात सहभागी असणाऱ्या घटकांमध्ये जमीन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर आदीमुळे पिकती जमीन दिवसेंदिवस निकृष्ट होत आहे. यामुळे पिकाच्या वाढीवर, उत्पन्नावर परिणाम होत आहे. शेती नियोजनात जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृदा व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी संशोधकांकडून देण्यात येत आहे.जमिनीचा पोत जाणून घेण्याबाबत शेतकरी जागृत झाले आहेत, तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहान देण्यासाठी जमिनीची आरोग्य पत्रिकाही देण्यात येत आहेत. शेतीबाबतची जनजागृती करून, उत्पादन क्षमता वाढविण्याबाबतचे त्यांना मार्गदर्शनही केले जात आहे. मार्च अखेरपर्यंत सर्व मातीचे नमुने आणि जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्याचे नियोजन केले आहे. - सिद्धाराम भुजबळ, जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी