लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाराष्ट्र शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सुरू केली आहे, मात्र महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरवले जात असल्याचा प्रकार उघड झाला असतानाच एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल कंपनीमधील रासायनिक गाळ (स्लज) रस्त्यावर सांडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आणि नागरिकांच्या तक्रारी फक्त कागदावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एमआयडीसीतील नाले आणि गटारात कंपन्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. येथील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर पाणी साचले आहे. कंपनीने हे पाणी पंपाद्वारे उचलण्याचे काम केले. मात्र हे पाणी आपले नसल्याचे ठामपणे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. येथील जलवाहिनीला असलेली गळतीही काढण्यात आली आहे. जलवाहिनीला गळती असली तरी ते पाणी स्वच्छ असते. मात्र सुदर्शन कंपनीलगत फेसाळयुक्त पांढरे पाणी दिसून येत आहे. त्यामुळे गळतीच्या पाण्यात कंपनीच्या आवारातील जीप्समचे पांढरे पाणी जमिनीत मुरून बाहेर येत असावे असा संशय व्यक्त केला जात होता. तरी कंपनीने इतरांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली.गुरुवारील रस्त्यावर रासायनिक स्लज आढल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महाड कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी सागर आवटी यांच्याशी संपर्क साधला असता, वाहतुकीदरम्यान रासायनिक स्लज रस्त्यावर सांडल्याप्रकरणी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज महाड यांच्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी हमी संबंधित कंपनीच्या विभागामार्फत देण्यात आल्याचे आवटी यांनी सांगतले. सुदर्शन कंपनी प्रदूषणाच्या विषयांमुळे कायम चर्चेत आहे. कंपनी प्रशासनाने एमआयडीसीकडे २०१८ मध्ये पत्रव्यवहार केल्याची माहिती कंपनी व्यवस्थापक बी.एन. कदम यांनी दिली. कंपनीलगत साचत असलेले पाणी आपले नसून या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्यामुळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.महाड एमआयडीसीतील या परिसरात सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीच नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे फेसाळयुक्त पाणी येण्याचा प्रश्नच येत नसल्याची प्रतिक्रिया साहाय्यक अभियंता एस. एस. गीते यांनी दिली. तर एमआयडीसीतील पाणीपुरवठा विभागाचे बी.एल. वाघमारे यांनीही या ठिकाणी पाहणी करून हे पाणी आपले नसल्याचे सांगितले. यामुळे या ठिकाणी नक्की कोणाचे पाणी मुरते, हा प्रश्न निर्माण झाला होता.एमआयडीसीतील कारखान्यांत मोठमोठे खड्डे करून रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरवले जात असल्याचा प्रकार यापूर्वी नेक ग्लोबल लिमिटेड कंपनीमध्ये उघडकीस आला होता. याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीविरोधात कारवाईदेखील केली; मात्र त्यानंतरही रासायनिक सांडपाणी येत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रदूषणकारी कंपन्यांचे आयएसओ नामांकन रद्द करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे भारत सरकारच्या जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक स्वाई यांनी स्पष्ट केले.
महाडमध्ये रासायनिक गाळ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:17 PM