‘त्या’ रसायनाची अद्याप दुर्गंधी !

By admin | Published: December 31, 2016 04:24 AM2016-12-31T04:24:50+5:302016-12-31T04:24:50+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील

'That' chemical is still bad! | ‘त्या’ रसायनाची अद्याप दुर्गंधी !

‘त्या’ रसायनाची अद्याप दुर्गंधी !

Next

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील दोन ग्रामस्थ जखमी झाले होते. नंतर त्या ठिकाणी अ‍ॅसिड गळतीच्या त्रासामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या अपघाताने रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक छोट्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तीन दिवस उलटले तरी त्या ठिकाणी शुक्रवारी दुर्गंधीचा त्रास कायम आहे. विभागातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कोण देणार, याबाबत दासगावकर नागरिक संभ्रमात आहेत. अपघातानंतर महामार्गाचा कठडा तुटला. महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र एकही महामार्ग अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी न आल्याने या खात्याविरोधात नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडचा हा टँकर महाड औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्याचा असल्याने जखमी ग्रामस्थाला कारखान्याकडून १० हजारांची मदत देण्यात आली आहे.
२८ डिसेंबरला अपघातानंतर चार तासांनी टँकर गळती नियंत्रणात आणून वाहणाऱ्या अ‍ॅसिडवर नियंत्रण आणण्यात महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रण मंडळ, सेफ्टी पॅन तसेच लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्यातील सेफ्टी टीमला यश आले. एवढे होत असताना देखील दोन दिवस या ठिकाणी त्रास कायमच होता. संध्याकाळी जवळच एक मोठा खड्डा मारून टँकरद्वारे पाणी मारून रस्ता साफ करण्यात आला. मात्र धुतलेल्या रस्त्याचे पाणी त्या ठिकाणी खड्ड्यात साचलेले असून रस्त्यावर देखील ठिकठिकाणी अ‍ॅसिड पडलेले आहे. त्यामुळे दोन दिवस उलटले तरी त्या परिसरातील दुर्गंधी कायम आहे. याचा फटका मात्र जवळच असलेल्या आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस व दवाखाना, भाजी दुकान, चहाची टपरी, सलून व इतर दुकानांना बसला आहे.
शुक्रवारीही दुकाने या वासाच्या त्रासामुळे बंद ठेवावी लागत आहेत. त्याच दिवशी महसूल खात्याकडून तलाठ्यामार्फत या घटनेचे पंचनामे करण्यात आले. दुकानातील मालाचे नुकसान सोडता इमारतीचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. यासाठी दुकानदारांना एकही रुपया मदत मिळालेली नाही. तलाठ्यांनी केलेले पंचनामे महाड तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. परंतु आता यांना मदत कोण देणार?सरकारी लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखाना. यामुळे सध्या दासगावकर नागरिक संभ्रमात आहेत. सध्या दासगावकर नागरिक वाऱ्यावर आहेत.
अपघातानंतर दासगावमधील दोन ग्रामस्थ सचिन पयेलकर तसेच संदेश जाधव या दोघांना जबर मार बसला. या दोघांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पयेलकर याच्या पायाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने लक्ष्मी कारखान्याकडून त्याला तातडीची १० हजारांची मदत देण्यात आली, तर पुढील उपचाराचा संपूर्ण पैसा देण्यात येईल. त्याचबरोबर दासगाव ठिकाणी स्वच्छतेचा विचार करण्यात येईल व या अपघातामुळे ज्या लोकांचे नक्कीच नुकसान झाले असेल त्याची सखोल पाहणी व चौकशी करून मदतीसाठी त्यांचाही विचार करण्यात येईल, अशी माहिती लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्याचे व्यवस्थापक विनोद देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)

महामार्गावर अपघाताचा
धोका कायम, अधिकारी सुस्त
अपघातामध्ये महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु तीन दिवस झाले तरी महाड राष्ट्रीय महामार्गावरून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याची किंवा पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही.
कठडा तुटल्याने त्या ठिकाणी अवघड वळण आहे व त्या ठिकाणी कधीही अशा पद्धतीची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या हजगर्जीपणामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या इथे सांडणाऱ्या केमिकलची तपासणी करण्यात यावी, नक्की अ‍ॅसिडिक अ‍ॅसिड आहे का? त्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या खात्याकडून हलगर्जीपणा तपासणीमध्ये करण्यात आलेला आहे, त्या त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व दासगावमधील नागरिकांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

हे अ‍ॅसिड श्वसनातून गेले तर घशाला सूज येणे, दम लागणे, लघवी लाल होणे, डोळे लाल होणे, पोटात गेले तर जुनाब किंवा उलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अपघाताजवळ असलेल्या दोन्ही विहिरींचे पाण्याचे नमुने घेवून तपासणी करूनच पाण्याचा वापर करावा, असे दासगाव ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे
- डॉ. वि. वि. पाटील, वैद्यकीय अधिकारी, दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

घटनेच्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहे. दोन दिवस वास राहील. त्या ठिकाणी जो खड्डा केला आहे तेथे काही प्रमाणात सांडलेले अ‍ॅसिड आहे. ते साफ करण्याचे ओबरल लक्ष्मी कारखान्याला सांगण्यात आलेले आहे.
- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

Web Title: 'That' chemical is still bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.