लोकमत न्यूज नेटवर्क, लोणावळा: मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल टँकरवरील चालकाचा ताबा सुटून तो पुलावरील दुभाजकाला धडकला. टँकरमधील केमिकलने पेट घेतल्याने पेटत्या टँकरमधून केमिकल व आगीचे लोट पुलाखाली असलेल्या दुचाकीवर पडून त्यात महिलेसह दोन मुलांचा तसेच टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली.
या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेवेळी पुलाच्या खाली व पुलाच्या वर आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग बंद केला होता.
मुलांसाठी आक्रोश : पुलाच्या खालून दुचाकीवरून जाणाऱ्या महिला व दोन मुलांच्या अंगावर आगीचा लोळ पडला. यात कुशल कैलास वरे (९), रितेश महादू कोशिरे (१७), सविता कैलास वरे (३३) यांचा मृत्यू झाला. दूरवर पडलेली महिला आक्रोश करत होती. नंतर तिचाही रुग्णालयात मृत्यू झाला.
डांबराचा थर वितळला : अपघातात टॅंकरमधील केमिकल रस्त्यावर पसरल्याने आणि आगीमुळे पुलावरील रस्त्याचा डांबराचा थर वितळला. सुदैवाने टॅंकरचा स्फोट झाला नाही. यामुळे पुलाच्या स्ट्रक्चरला सध्या तरी कोणताही धोका झालेला नाही.
पुण्यात हॉटेलला आग, तीन कामगारांचा मृत्यू
पुणे : मार्केट यार्डातील गेट क्रमांक एकजवळील रेवळसिद्ध हाॅटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने हॉटेलचे शटर तोडून तिघांना बाहेर काढले. दोघे मृतावस्थेत आढळून आले तर एचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. शशिकांत सोनबा गडाप्पा (२८, रा. सोलापूर), संदीप, मुन्ना मोतीलाल राठोड (३७, रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.