रसायनाने भरलेला टँकर खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:16 PM2019-12-19T23:16:01+5:302019-12-19T23:16:35+5:30
दोन तास वाहतूककोंडी : टँकर फुटल्याने नागरिक भयभीत
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गुरुवारी रसायनाने भरलेल्या टँकरला अपघात होऊन टँकरने पेट घेतला. चालकाने उडी मारल्यानंतरही टँकर रस्त्यावर ५० मीटरपर्यंत पुढे गेला आणि एका पुलावरून खाली ताकई - आडोशी रस्त्यावर कलररूफ कंपनीजवळ कोसळला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी टँकर जळून पूर्णत: खाक झाला. यामुळे मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर व ताकई - आडोशी रस्त्यावर वाहतुकीची दोन तास कोंडी झाली होती.
टँकर खाली कोसळताना तो एका ट्रान्सफॉर्मरवर पडला. त्यामुळे आडोशी - ढेकू परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. टँकर फुटल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला.
देवदूत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य रुग्णालयाचे पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे पथक, महामार्गा पोलीस, पो.नि. जगदीश परदेशी यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली तर टाटा स्टील, रिलायन्स, एचपीसीएल, खोपोली फायर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आयएनएसचे अधिकारी एस.जी. साठे पथकासह उपस्थित होते. आयएनएस शिवाजी पथक टँकरमधून पडलेल्या रसायनाचा अभ्यास करणार असून या रसायनाचा भविष्यात ग्रामस्थांना त्रास होणार नाही ना? याचीही तपासणी करणार आहे.