- सिकंदर अनवारदासगाव - महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आहेत. या पिंपामध्ये कोणत्या प्रकारची केमिकल आहेत, याचा कोणालाच थांगपत्ता नाही. बंद कारखान्यांनी उघड्यावर ठेवलेल्या रसायनाची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रीव्ही कारखान्यात एवढी मोठी दुर्घटना घडली असताना अद्याप प्रशासनाकडून उघड्यावर ठेवलेल्या रसायने आणि संबंधित कंपन्यांवर कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे पुन्हा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार, एखादा कारखाना अगर कंपनी बंद केल्यानंतर त्याबाबतची माहिती एमआयडीसी किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणे आवश्यक आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कागदोपत्री बंद झाले असले, तरी छुप्या पद्धतीने आजही सुरूच आहेत. प्रत्यक्षात कारखाना उत्पादन करत नसला तरी मोकळ्या जागांवर रसायनाची भरलेली पिंपे, गोणी, भंगार दिसून येत आहेत. काही ठिकाणी भंगाराच्या नावाखाली रासायनिक घनकचरा, सांडपाणी पडलेले दिसते. एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा प्रीव्हीसारखी दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.महाड औद्योगिक क्षेत्रातील निंबुज फार्मा हा कारखाना कधीच बंद झाला आहे. या बंद कारखान्याच्या प्लॉटमध्ये आजही मोठ्या प्रमाणात केमिकल भरलेली पिंपे पडून आहेत. याचा वाली कोण, या पिंपांमध्ये कोणते रसायन आहे, नक्की याच कारखान्याच्या आहेत की कोणी गोदाम बनवून उघड्यावर केमिकलचा साठा केला आहे. यासंदर्भात प्रशासनाला माहिती आहे की नाही? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये उघड्यावर केमिकल हाताळले जात आहेत. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाही. प्रीव्ही कारखान्याच्या सुरक्षा यंत्रणेमुळे कारखाना आणि परिसर वाचले. मात्र, उघड्या प्लॉटमध्ये आग लागली तर जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख कारखाने वगळले तर छोट्या कारखान्यांमधून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. छोट्या कारखान्यांच्या परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त रसायन सांडलेले दिसून येते. मोकळ्या आणि उघड्या जागेवर रसायनाने भरलेले पिंप उन्हात पडून आहेत. कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही नियम पाळले गेलेले दिसून येत नाही. एखादी आगीसारखी दुर्घटना घडल्यास आगरोधक अशी सुरक्षा यंत्रणा येथे कार्यरत नाही. छोट्या कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते.कारखाना निरीक्षकांवरकारवाई कराकारखान्यातील परिसर, कामगार सुरक्षा आदीबाबत कारखाना निरीक्षकांनी वेळोवेळी कंपन्यांना सूचना करणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतरच कारखाना निरीक्षक औद्योगिक क्षेत्रात फेरफटका मारतात. यामुळे कारखानदाराचे फावत असून बेदरकारपणे वागत सुरक्षिततेवर कोणतेच लक्ष देत नाही. यामुळे कारखाना निरीक्षकांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून जे कारखाने नियमांचे उल्लंघन करीत आहेत, त्यांना नोटिसा काढून प्रादेशिक अधिकारी आणि कार्यकारी अभियंतामार्फत कारवाई करण्यात येईल.- बाळासाहेब झंजे, औद्योगिक विकास महामंडळप्रदूषण नियंत्रणमंडळ फक्त नावालाकारखाना बंद केल्यानंतर रासायनिक माल इमारतीमध्ये आणि परिसरात तसाच पडून आहे. यामुळे महाडमधील ग्रामस्थ, भटक्या जनावरांना याचा फटका बसू शकतो. पावसाळ्यात उघड्यावरील रसायन पाण्यात मिसळते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशी केली असता, जागेची मालकी एमआयडीसीची असल्याने त्यांनी कारवाई करावी, असे उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिले.भंगारापासून धोका कायममहाड औद्योगिक क्षेत्रात अनेक भंगार अड्डे आहेत. त्या सर्व भंगार अड्ड्यांचे मालक परप्रांतीय आहेत. गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात एकही स्थानिकाला येथील कारखान्यांमधून मोठा भंगाराचा ठेका देण्यात आलेला नाही. हे भंगार अड्डे फक्त कारखानदारांच्या भंगारसाठीच वसलेले आहेत.बहुतेक अड्ड्यांवर कारखान्यांचे केमिकल देखील हाताळण्यात येते. मात्र, या भंगार अड्ड्यांवर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. कारवाईची वेळ आल्यानंतर पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवतात. काही वर्षांपूर्वी आपटे या कारखान्यात भंगार कटिंगचे काम सुरू होते. अचानक स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर तीन वर्षांपूर्वी एका भंगार अड्ड्यावर केमिकल हाताळताना चार कामगारांचा वायुगळतीने मृत्यू झाला होता.वर्षभरापूर्वी एका भंगार अड्ड्याला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल आठ तास लागले. शिवाय या वेळी संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, या भंगार अड्ड्यावर काय जळत होते, कोणते केमिकल होते, याचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही. त्यामुळे बेकायदेशीर असणाºया या भंगार गोदामावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:52 AM