लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : जानेवारी महिन्यामध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यासोबतच वीट व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याची बाब समोर आली आहे. त्यासोबतच अवकाळी पावसाचा फायदा घेत, कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून, कोरोना महामारीसोबतच बदलत्या हवामानाचा संकटामुळे कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यात बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्याकरिता तगादा लावलेला असतानाच, अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने, वीट व्यावसायिकांना मजुरांचे दैनंदिन वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर अवकाळी पावसाचा फायदा घेत, दुसरीकडे महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडून रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्याचा धडाका लावला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते. मात्र, अवकाळी पावसाने हे पाणी सावित्री व काळ नदीपात्रात मिसळल्यास अनेक गावांच्या पाणी योजनांना त्याचा फटका बसून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परिणामी, प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे.