माणगाव : चिपळूण एमआयडीसीमधून १५० किलोमीटर लांब १ जुलै रोजी रात्री पोटणेर व वावेदिवाळी गाढी नदीशेजारी पोटणेर येथील एका ग्रामस्थाच्या जागेत विषारी प्रदूषणयुक्त असा दोन ट्रक माल टाकण्यात आला होता. त्यावेळी माणगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नदीचे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असल्यामुळे माणगाव पोलीस ठाण्यात याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सागर औटी (रा.नवेनगर महाड) यांनी जागा मालकाच्या विरुद्ध २४ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे.
माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोटणेर येथील शेतकरी उल्हास दगडू चव्हाण यांच्या शेतामध्ये सर्वे नं. २६६ मध्ये वाहन क्र. एम एच १० झेड ७६४ मधून आणलेला रासायनिक द्रव्याचा ड्रम उतरून घेऊन तो या शेतामध्ये पुरल्याने त्यातील रासायनिक द्रव्य पाझरून पाण्यात मिसळून येथील नदीच्या पाण्याचा जलस्रोत प्रदूषित होण्याची शक्यता आहे. असे तक्रारीत नमूद असून आरोपी उल्हास दगडू चव्हाण (रा.पोटणेर) यांच्यावर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना वडते करीत आहेत.