सुदर्शन कंपनीत टँकरमधून रसायन गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:21 AM2019-09-23T02:21:58+5:302019-09-23T02:22:05+5:30

नाला प्रदूषित झाल्याने माशांचा मृत्यू : बारसोली, किल्ला ग्रामस्थांना वायू प्रदूषणाचा त्रास

Chemicals leak from tankers at Sudarshan Company | सुदर्शन कंपनीत टँकरमधून रसायन गळती

सुदर्शन कंपनीत टँकरमधून रसायन गळती

googlenewsNext

रोहा : रोहा धाटाव येथील सुदर्शन कंपनीत अपघातांची मालिका सुरूच असून कंपनीत टँकरमधून रसायन गळती झाल्याने शेजारील बारसोली, किल्ला आदी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचा त्रास झाला. त्याचबरोबर सांडपाण्याने येथील नाला प्रदूषित झाल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली, परिणामी येथिल ग्रामस्थांनी कंपनीत धडक देत आपला संताप व्यक्त केला आणि कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. यासर्व प्रकाराने औद्योगिक परिसरात मात्र खळबळ माजली.

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन कंपनीतील छोटे मोठे अपघात सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कंपनीच्या आवारात उभा असलेला हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड या विघातक रसायनाने भरलेल्या टँकरमधून अचानक गळती सुरू झाली. या टँकरमध्ये पंधरा हजार लिटर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड होते. जमिनीवर हे रसायन पडले आणि त्यातून दूषित वाफ निघु लागली, ती वातावरणात पसरत परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले. याचा त्रास नजिकच्या बारसोली व किल्ला गावातील नागरिकांना जाणवू लागला. या रसायनाची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याचा मारा प्रमाणात केला असता कंपनीच्या बाजुलाच असणा-या नैसर्गिक नाल्यात हे पाणी गेले. त्यामुळे नाल्याचे पाणी पिवळे होत या नाल्यातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले होते.

सध्या परतीच्या पावसाची सुरुवात झाल्याने आदिवासी बांधव याच नाल्यात तसेच पुढे नदीला मिळणा-या पाण्यात मासे पकडतात, त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. या नाल्यातील पाणी पुढे नदीला जाऊन मिळत असल्यामुळे कुंडलिकेत पाणी प्रदूषित होत जलचरांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली गेली. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीबाबत लगतच्या किल्ला व बारसोली गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी कंपनीत धडक देत व्यवस्थापक बि .एन. कदम यांना धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला.

कंपनी यार्डमध्ये हा टँकर लिकेज झाला. या घटनेबाबत नक्की कारण समजू शकले नसले तरी यामागची चौकशी आम्ही करत आहोत.
- बि .एन.कदम, कंपनी व्यवस्थापक
निवडणूक कामात व्यस्ततेमुळे या घटनेची माहिती घेता आली नाही. मात्र यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधून पुढील आवश्यक ती कारवाई करु.
- कविता जाधव, तहसिलदार, रोहा
टँकरमधून रसायन गळती झाल्यावर तातडीची उपाययोजना म्हणून त्यावर भरपूर प्रमाणात पाणी मारुन याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांना होऊ नये म्हणून काळजी घेतली.
- सुदाम करपे, सुरक्षा अधिकारी

Web Title: Chemicals leak from tankers at Sudarshan Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.