रसायनयुक्त सांडपाणी येरद गावच्या नदीपात्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:05 AM2019-04-16T00:05:55+5:302019-04-16T00:06:02+5:30

माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेली

Chemistry wastewater in the river bank of Yerad village | रसायनयुक्त सांडपाणी येरद गावच्या नदीपात्रात

रसायनयुक्त सांडपाणी येरद गावच्या नदीपात्रात

Next

- गिरीश गोरेगावकर 

माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेली असून या पोस्को कंपनीचे रासायनिक सांडपाणी हे येलवडे येथून येणाऱ्या नदीचे पाणी व येरद येथील नदीचे पाणी यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी सोडले जाते. असे दूषित पाणी या ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना दिले जाते. अशा विषारी पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१९९८मध्ये ग्रुपग्रामपंचायत कडापेने ४० लाखांची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर काळ नदीपात्रात बांधली असून हे नदीपात्र जानेवारी ते मे महिन्यामध्ये संपूर्णपणे कोरडे पडायचे व त्या नदीपात्रात असलेल्या विहिरी मात्र भरलेल्या असायच्या त्या ठिकाणाहून येरद, कडापे, बादलवाडी, कडापेवाडी, कांदळगाव या गावांना नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेल्यामुळे ही कंपनी रात्रीच्या वेळेस आपले रसायनयुक्त दूषित पाणी या काळ नदीपात्रात सोडत असल्याने हे रसायनमिश्रित प्रदूषित पाणी थेट या बांधलेल्या नदीपात्रातील विहिरीमध्ये जात आहे.
उन्हाळ्यात कोरडी पडणारी नदी या पोस्कोच्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे भरलेली असून या नदीपात्रातील पिण्यासाठी बांधलेल्या विहिरी देखील या पाण्याखाली गेल्या आहेत. एक प्रकारे येरद गाव, कडापे, बादलवाडी, कडापेवाडी, कादळगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्यात पोस्को कंपनी ही विष कालवून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी व तसेच येरद गावातील ग्रामस्थ यांनी सांगितले.
तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी याबाबतची तक्रार दोन वर्षांपूर्वी माणगाव प्रांत कार्यालयामध्ये केली होती. माणगाव प्रांत कार्यालयामध्ये ही केस दोन वर्षे चालून ती बंद करण्यात आली असून त्यावर लवकरच निर्णय देणार असल्याचे समजते.
पोस्को कंपनी व्यवस्थापकांकडून त्यावेळेस दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु तेथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ते नाकारले आहे. सर्वच वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास ३ हजार आहे. येथील वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येरद या ठिकाणी ग्रामस्थांना बोअरवेलचे पाणी मिळत असून भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बोअरवेलद्वारे होणारा पाणीपुरवठा सुद्धा खूप कमी झाला आहे. यामुळे पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही असे तेथील ग्रामस्थ शरद मोकाशी व तेथील महिला पोटतिडकीने बोलत होत्या. याबाबत पोस्को कंपनीचे व्यवस्थापक महेश गोखले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
दूषित पाण्यामुळे आजारांना आमंत्रण
काळ नदीपात्रातील पाण्यावर तवंग येत असून येथील नागरिकांना अंगावर खाज येऊन फोड येतात, केस गळतात तसेच पाण्यामुळे अशा अनेक आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच हे पाणी आदिवासी बांधव गुरे व बकऱ्यांसाठी, कपडे धुण्यासाठी वापर करत असल्यामुळे त्यांना तसेच त्यांच्या मुक्या प्राण्यांना देखील अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे निजापूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाडकर तसेच कडापे ग्रामपंचायत अंतर्गत असणारी आदिवासी वाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते राम कोळी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
>विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को कंपनीत ट्रीटमेंट प्लांट आहे, आमचे निरीक्षक वेळोवेळी कंपनीत भेट देत असतात. परंतु पोस्को कंपनीने त्यांचे रसायनयुक्त पाणी नदीत सोडतात असे कधी निदर्शनास आले नाही. जर ग्रामस्थांची तक्रार असेल तर मी कंपनीला भेट देऊन शहानिशा करतो.
- एस. व्ही. आवटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ कार्यालय महाड

Web Title: Chemistry wastewater in the river bank of Yerad village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.