चेंढरे ग्रामपंचायतीची करवसुली झाली हायटेक, प्रत्येक घराबाहेर असणार क्यूआर कोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:48 AM2023-01-25T05:48:56+5:302023-01-25T05:49:15+5:30
वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अलिबाग :
वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम विकासावर होतो. हीच बाब लक्षात घेत येथील चेंढरे ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’द्वारे हे काम पूर्ण होणार असून, पारदर्शकता येणार आहे. प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करून त्यांचे क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. पाणीपट्टी व घरपट्टीचे मापन त्याद्वारे कार्यान्वित करणारी चेंढरे ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सरपंच स्वाती पाटील यांच्या हस्ते मंगळवारी अनौपचारिकपणे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, ‘ग्रामपंचायत कर्मचारी पाणी आणि घरपट्टी घरोघरी जाऊन वसूल करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. अनेक वेळा वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागते. चेंढरे गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अशी वसुली करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच शंभर टक्के करवसुली न झाल्याने गावाचा विकास साधता येत नाही. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘चेंढरे ग्रामपंचायत - अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’ सुरू झाली. यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला आहे.’
यावेळी प्रियदर्शनी पाटील, मीनल माळी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, सदस्य यतीन घरत, ममता मानकर, रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी नीलेश गावंड, ललित कदम, नीलेश सावर्डेकर, देवेश गवस, स्नेहल मोरे उपस्थित होते.
क्यूआर कोड असा होणार स्कॅन
ग्रामपंचायतीमार्फत घराच्या दरवाजासमोर घर क्रमांकाचा बिल्ला लावला जातो. त्यानुसार घर क्रमांकाची माहिती नागरिकांना मिळते; परंतु आता हा बिल्ला कालबाह्य होणार आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’ सुरू केली आहे. या प्रणालीमार्फत कर वसुली करीत असताना प्रत्येक घरासमोर घर क्रमांकाच्या बिल्ल्याऐवजी क्यूआर कोडचे लेबल लावले जाणार आहे. यातून ग्रामपंचायत कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करू शकतो. सर्व खातेदारांचा डेटा अचूकपणे अपडेट ठेवला जाईल.