दासगाव : मंगळवारी आलेल्या वादळी पावसाबरोबर सावित्री नदीत रासायनिक तवंग दिसू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या रसायनामुळे नदीत एक मगर अर्धमेल्या अवस्थेत आढळली.महाड, पोलादपूर परिसरात वादळीवाऱ्यासह आलेल्या गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. दादली पुलाजवळ सावित्री नदीच्या पाण्यावर पिवळ्या रंगाच्या रसायन सदृश तवंग दिसून आला. स्थानिक प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ होते. महाड महसूल किंवा एमआयडीसी प्रशासनाकडे याबाबत काहीही माहिती नसल्याने रसायन सदृश तवंगाने मानवी आणि जलचर संपत्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.महाड परिसरातील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कधी कंपन्यांचे सांडपाणी तर कधी मलनि:सारण वाहिनी फुटल्याने सांडपाणी सावित्रीत मिसळून नदीपात्र दूषित होते. यामुळे अनेकदा या परिसरात रासायनिक सांडपाण्याचा मुद्दा कायम पुढे येत असतो.
सावित्री नदीवर रसायनाचा तवंग, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन मात्र अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:01 AM