कर्जत : आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सर्व समाजांना एकमेकांविरोधात खेळवत आहे, त्यामुळे तिढा वाढत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्जतमध्ये केला.
शहरातील टिळक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या संपर्कयात्रेची सभा शुक्रवारी संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सरचिटणीस सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, महिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, गफार मलिक, रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, दीपिका चिपळूणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भुजबळ म्हणाले की, सरकारला कायद्याची कोणतीही चाड नाही. ‘हम करे सो कायदा’ या धोरणाचा अवलंब करीत देशात मनुवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफीमुळे देशातील जनता संतप्त आहे. ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची नक्कल करत व विनोदी किस्से सांगून सभेत हास्याचे फवारे उडवले.
अजित पवार यांनी, केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे जातीयवादी, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी आणि सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणार असल्याची टीका या वेळी केली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी, शिवसेना म्हणजे नखे आणि दात काढलेला वाघ असल्याची बोचरी टीका करून कर्जतच्या निर्धार सभेत एक फलक दिसला त्या फलकावर घोषवाक्य होते, ‘आता बस्स एकच निर्धार, अबकी बार मोदी की हार’ हीच घोषणा आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत कामाला येईल. २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी जनतेला जी आश्वासने दिली ती साडेचार वर्षांत पूर्ण झाली नसल्याचे सांगितले.
सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, चित्रा वाघ, नवाब मलिक यांचीही भाषणे झाली. परिवर्तन यात्रेच्या सभेचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केले.