मुंबई - तब्बल दिडशे वर्षानंतर रायगडवरील हत्ती तलाव तुडुंब भरल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. भरलेला हत्ती तलाव बघण्याचा मोह छत्रपती संभाजीराजेंना आवरता आला नाही, त्यामुळे खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी रायगडचा दौरा केला, रायगड संवर्धनाची जबाबदारी घेतल्यापासून कामांचा आढावा घेण्यासाठी गडावर नेहमी येतच असतो, पण कोरोनामुळे काही काळ शक्य झालं नाही, अखेर हत्ती तलाव भरल्यानंतर त्यांनी गडावर जाऊन नयनरम्य दृष्याचा आनंद घेतला.
याबाबत खासदार संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटलंय की, भर पावसात रायगड पाहण्याचा आनंद वेगळाच! काठोकाठ भरलेल्या हत्ती तलावातील पाण्याचे पुजन यावेळी करण्यात आले. गडावरची निर्गुडीची पाने, रान फुले वाहून अगदी साधेपणाने परंतु मनोभावे जलपूजन केले. रायगड विकास प्राधिकरणाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहेच पण, गडावरील वास्तूंच्या इतिहासात प्राधिकरणाचे अमुल्य योगदान सुद्धा आहे असं ते म्हणाले.
तसेच प्राधिकरणाच्या संबंधित सर्व सदस्य, तज्ञ, अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी अहोरात्र केलेल्या कष्टाचे आणि सर्व शिवभक्तांच्या पाठिंब्याचे हे फलीत आहे. हत्ती तलावात भरलेले निळेशुभ्र पाणी पाहून ते पिण्याचा मोह मी रोखू शकलो नाही. या तलावातील पाणी कदाचित शिवछत्रपती, संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी सुद्धा पिले असेल, असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. त्याकाळी असंख्य मावळ्यांची तहान या तलावाच्या भागवली असेल अशी भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली.
दरम्यान, तलावाला अजूनही एक-दोन ठिकाणी गळती आहे, त्याच काम येत्या काही दिवसात करण्यात येईल.यापूर्वीही या तलावाची गळती काढण्यासाठी पाच ते सहा वेळा प्रशासनाकडून प्रयत्न झाले होतेअसे म्हणतात.पण, कुणालाही यश मिळाले नव्हते. यावेळा आपण यशस्वी झालो असा विश्वास खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला.
तब्बल दीडशे वर्षांनी हत्ती तलाव पूर्ण भरला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, अनेक शिवप्रेमींसाठी रायगड किल्ला हा श्रद्धेचे स्थान आहे. याठिकाणी असलेल्या हत्तीतलाव सध्या चर्चेत आहे, कारण तब्बल १५० वर्षांनी हा तलाव तुडुंब भरल्याचं स्थानिक सांगतात. रायगड प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने किल्ल्याच्या डागडुजीचं काम केलं त्याचा हा परिणाम आहे. असे क्षण आयुष्यात खूप कमी येतात, ज्यांचं समाधान आयुष्यभर लाभतं असं प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...
बेडसाठी हॉस्पिटलच्या माराव्या लागल्या चक्करा; मृत्यूनंतरही १७ तास मृतदेह ताटकळत ठेवला
नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं