छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिराचे श्रीशैल्य येथे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 08:13 PM2018-03-29T20:13:18+5:302018-03-29T20:13:18+5:30
श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.
अलिबाग - इ. स. १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी गेले असता श्रीशैल्य येथे आले होते. शिवाजी महाराज प्रखर शिवभक्त होते. त्यांना श्रीशैल्यम येथे अलौकीक अनुभूती आली. त्यावेळी आपले मस्तक मल्लिकार्जून ज्योतिर्लिंगावर आणि भ्रमरांबा देवीच्या शक्तीपीठावर वाहून त्याचा अभिषेक करायची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.तेव्हा साक्षात भवानी माता तेथे प्रकट झाली आणि तिने त्यांना पुढील राष्ट्रकार्याची आठवण करून कृपाआशिर्वाद दिले. श्रीशैल्य येथे त्यावेळी महाराजांनी काही काळ वास्तव्य केले होते.मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग मंदिरासाठी मोठी देणगी दिली. मंदिराची सुयोग्य व्यवस्था लावून दिली आणि बराचसा भूभाग मंदिरासाठी जोडून दिला. त्यावेळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार नव्याने बांधून काढले. आजही ते शिवाजी गोपूरम या नावाने ओळखले जाते.
श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. त्याच ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यान मंदिराचे उद्घाटन दि. १ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे अर्थ आणि वनमंत्री श्री. सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. रंगा हरी हे उपस्थित राहणार आहेत.राजस्थानातील लाल दगडातून घडविलेले आणि पुण्यातील धायरी येथील कलाकारांनी निर्मिलेले अत्यंत देखणे आणि भव्य असे हे ध्यान मंदिर आहे. अधिकाधिक शिवभक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी मेमोरिअल कमिटीने केले आहे.