छबिना उत्सवाला लोटला जनसागर; संपूर्ण महाड भक्तिमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:24 PM2020-02-26T23:24:41+5:302020-02-26T23:24:44+5:30
हजारो भाविकांनी घेतले दर्शन; लळिताच्या कीर्तनाने सांगता
महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या छबिना उत्सवाची बुधवारी सकाळी लळिताच्या कीर्तनाने सांगता झाली. संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. या उत्सवानिमित्त संपूर्ण महाड भक्तिमय वातावरणाने फुलून गेल्याचे दिसून आले.
या निमित्ताने विरेश्वर मंदिर परिसरात, गाडीतळ, शिवाजी चौक, बाजारपेठ आणि परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली होती. दिवसेंदिवस या उत्सवाची व्याप्ती वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी सायंकाळपासून तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या विरेश्वराच्या भेटीला वाजत गाजत आल्या. सर्वात महत्त्वाचा मान असलेल्या विन्हेरच्या झोलाई देवीचे पालखी आगमन रात्री उशिरा १ वाजल्याच्या सुमारास झाले. ढोल, नगाऱ्याच्या निनादात झोलाईच्या आगमनानंतर भक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या वेळी भक्त बेधुंद होऊन नाचत होते. देवीचा गोंधळ झाल्यानंतर पहाटे विरेश्वर महाराजांसह सर्व ग्रामदेवतांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाषण काठ्या नाचवतानाचे दृश्य पाहायला गाडीतळ परिसरात मोठी गर्दी झाली होती. बाजारपेठ मार्गे ही पालखी मिरवणूक पुन्हा विरेश्वर मंदिरात आल्यानंतर लळिताच्या कीर्तनाने या छबिना उत्सवाची सांगता करण्यात आली.
विरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिलीप पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच अनंत शेट, छबिना उत्सव समितीचे अध्यक्ष समीर बुटाला, उपाध्यक्ष हेमंत तांदळेकर, विश्वस्थ नाना नातेकर, दीपक वारंगे आदी कार्यकर्त्यांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मेहनत घेतली. या उत्सवादरम्यान खासदार सुनील तटकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिक जगताप आदी मान्यवरांनी भेट दिली.
गाडीतळ परिसरात उंच आकाशपाळणे, टोराटोरा, उंच चक्र, मौत का कुवा, आदी अनेक प्रकारच्या मनोरंजनाची साधने होती. तर विविध प्रकारच्या दुकानांत खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
छबिना उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदीचा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर गर्दीवर असंख्य सीसीटीव्हींची नजर होती.
महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील व नगरपरिषद प्रशासनाकडूनही सुसज्ज असे नियोजन करण्यात आले होते. या उत्सवात सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने हा छबिना उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक अशीच ओळख बनली आहे.