अलिबाग: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारख्या थोर व्यक्तीमत्वाची सदिच्छा असली की चांगलं काम करण्याची उर्जा मिळते, असं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आज शिंदे यांनी सहकुटुंब डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले. तब्बल ४ तास ते आप्पासाहेब यांच्या निवासस्थानी होते. संध्याकाळी सव्वासहा वाजता ते मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी जवळच्या मारुती मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आज रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट आणि आशीर्वाद घेतले. आप्पासाहेब हे एकनाथ शिंदे यांचे अध्यात्मिक गुरू असून मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट होती.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून मोटारीने रेवदंडाकडे प्रयाण करीत निरुपणकार पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आगमन होताच मुख्यमंत्री शिंदे यांचे धर्माधिकारी परिवाराने जोरदार स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढे नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी निरुपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी तसेच त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.